मुंबई : इंटरनेटवर कधी काय होईल याचा नेम नसतो. बऱ्याचदा अनेक वर्षापूर्वीचे व्हिडिओ.. क्लिप्स पुन्हा व्हायरल होता. एखादा नेता एखादा कलाकार पूर्वी काय बोलला होता आणि तो आता काय करतोय हे अशा व्हिडिओमधून सांगितलं जातं. अगदी तशीच एक नवी क्लिप फिरू लागली आहे. ही मुलाखत आहे अध्ययन सुमन म्हणजे शेखर सुमन यांच्या मुलाची. आता कंगना आणि अध्ययन हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते ही गोष्ट नवी नाही. त्याच अनुषंगाने अध्ययनने चार वर्षापूर्वी दिलेली एक मुलाखत व्हायरल होते आहे, यात कंगना अमली पदार्थाचं सेवन सर्रास करत होती असा दावा अध्ययनने केला आहे.


कंगना आणि अध्ययन यांची जोडी जमली होती ती 2009 मध्ये. म्हणजे, राज या सिनेमाचं शूट करत असताना त्यातल्या एका गाण्याच्या चित्रिकरणावेळी या दोघांची मन जुळली. राज हा सिनेमाही महेश भट्ट यांचा आहे हा निव्वळ योगायोग असावा. तर त्यानंतर अध्ययन आणि कंगना बराच काळ एकत्र राहात होते. नंतर त्या दोघांमध्ये ह्रतिक रोशनचं नाव येऊ लागलं आणि मग कंगनाने अध्ययनला सोडलं असं म्हणतात. आता याच काळातल्या आपल्या नात्यावर अध्ययनने प्रकाश टाकला होता तो चार वर्षांपूर्वी. त्यावेळी त्याने दिलेल्या एका मुलाखतीत कंगना कशी अमली पदार्थाचं सेवन करत होती ते सांगितलं आहे. कंगना हॅश या अमली पदार्थाचं सेवन करत होती असं तो सांगतो. तो म्हणतो, 'अमली पदार्थाचं सेवन हे कंगनासाठी नवं नाहीय. ती हॅश हे ड्रग घेत होती. माझ्यासमोर तिने घेतलं आहे. इतकंच नव्हे तर ती कोकेनही घेत असावी. तिने कोकेन माझ्यासमोर घेतलेलं नाही. पण हॅश ती घ्यायची. तिने मलाही खूपदा ऑफर केली आहे पण मी कधी घेतलं नाही.'


अध्ययनच्या या स्पष्टीकरणानंतर मुलाखतकाराने त्याला प्रतिप्रश्नही केला. उद्या तू हे स्टेटमेंट देतो आहेस. पण कंगनाने याला नकार दिला तर? असं विचारल्यावर अध्ययन म्हणतो, 'ती हे नाकारेलच. पण तिच्यात जरा जरी खरेपणा असेल तर ती हे कबूल करेल.' ही क्लिप व्हायरल होऊ लागली आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर कंगना सातत्याने बॉलिवूडच्या अनेक कलाकारांवर दोषारोप लावते आहे. एकिकडे सुशांतच्या या प्रकरणात नार्कोटिक्स कमिशन ब्युरोही आता सहभागी झाला असतानाच अध्ययनची ही क्लिप पुन्हा फिरणं हे कंगनाची नवी डोकेदुखी ठरू शकते.


संबंधित बातम्या :