Kangana Ranaut : कट्टर मोदीभक्त कंगना रणौतचा राहुल गांधींवर पहिला हल्ला, म्हणाली, 'त्यांची ड्रग्ज टेस्ट...'
Kangana Ranaut On Rahul Gandhi: राहुल गांधी हे लोकशाहीचा अपमान करत असल्याचा आरोप कंगना रणौतने केला आहे. त्याचप्रमाणे अनेक मुद्द्यांवरुन तिने राहुल गांधींवर निशाणा साधला असल्याचं पाहायला मिळतंय.
Kangana Ranaut On Rahul Gandhi: 'राहुल गांधी (Rahul Gandhi) हे ड्रग्ज घेतात, त्यांची ड्रग्ज टेस्ट झाली पाहिजे', असा थेट वार कंगना रणौतने (Kangana Ranaut) राहुल गांधी यांच्यावर केला आहे. हिमाचल प्रदेशातून भाजपच्या तिकीटावर अभिनेत्री कंगना रणौत ही खासदार म्हणून निवडून आली. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पावर केलेल्य भाषणामुळे त्यांनी लोकशाहीचा अपमान केला असल्याचंही मत कंगनाने व्यक्त केलं आहे. त्यामुळे खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच कंगनाने राहुल गांधींवर थेट वार केला असल्याचं पाहायला मिळतंय.
कंगना रणौतने एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना यावर भाष्य केलं आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात चक्रव्यूहाचा केलेला शब्दप्रयोग, त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या टीकेवरुन निशाणा साधला आहे. देशात पंतप्रधानांची निवड लिंग, वय, जात आणि वर्ग लक्षात घेऊन केली जाते का? असा सवाल देखील कंगनाने राहुल गांधींना केला आहे.
कंगनाने काय म्हटलं?
राहुल गांधी यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना कंगनाने म्हटलं की, त्यांची ड्रग्ज टेस्ट व्हायला हवी. त्यांच्या भाषणातून ते कायमच संविधानाला ठेच पोहचवत असतात. कालही त्यांनी संसदेत चक्रव्यूह आणि ही भगवान शंकाराची वरात आहे, असं वक्तव्य केलं. त्यामुळे त्यामुळे त्यांची ही टेस्ट झाली पाहिजे. त्यांचं भाषण हे संसदेत कॉमेडी शो असतो, असंही कंगनाने म्हटलं आहे.
पुढे तिने म्हटलं की, संसदेत पोहोचल्यानंतर ते ज्या प्रकारे उद्धटपणे बोलतात ते पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. ज्या प्रकारे त्यांनी शंकाराची वरात आणि चक्रव्यूह असल्याचं म्हटलं आहे, त्यावरुन या माणसाची ड्रग्ज चाचणी झाली पाहिजे, असं नाही का वाटत? त्यामुळे त्यांची चाचणी व्हायला हवी. कदाचित ते तेव्हा दारुच्या किंवा ड्रग्जच्या नशेत असतील, असा गंभीर आरोपही कंगनाने केला आहे.
राहुल गांधी यांनी काय म्हटलं होतं?
सध्या एकविसाव्या शतकात देशात नव्या प्रकारचे चक्रव्यूह आहे. चक्रव्यूहाला पद्मव्यूह म्हटले जाते. ज्या प्रकारे अभिमन्यूला चक्रव्यूहमध्ये फसवण्यात आलं होतं. त्याच पद्धतीने आता भारतीय जनतेतील नागरिकांना फसवण्यात आलं आहे. सध्या देशातील युवक, शेतकरी, महिला, लघु आणि शूक्ष्म उद्योग चक्रव्यूहात फसले आहेत. महाभारतातील चक्रव्यूह सहा जण कंट्रोल करत होते. आताही नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, अजित डोवाल, अंबानी आणि अदाणी या सहा जाणांकडून चक्रव्यूहाला कंट्रोल केले जात आहे, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली.