(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gunaratna Sadavarte : जरुर जरुर जरुर! घरातून बाहेर आले तरीही सदावर्ते म्हणतात बिग बॉस मीच जिंकणार...
Gunaratna Sadavarte : बिग बॉसचा सीझन मीच जिंकणार असा विश्वास गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केला आहे.
Gunaratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte ) यांनी बिग बॉसच्या घरात (Bigg Boss 18) एन्ट्री घेतली आणि एकाच स्पर्धकाची चर्चा सुरु झाली होती. अगदी त्यांच्या एन्ट्रीपासूनच सलमानही आवाक् झाला होता. त्यानंतर घरातल्या स्पर्धकांनाही सदावर्तेंनी अगदी हटके अंदाजात स्वत:ची ओळख करुन दिली. त्यामुळे घरात पहिल्या दिवसांपासूनच एका स्पर्धकाची चर्चा सुरु होती. पण आता गुणरत्न सदावर्ते हे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहेत. असं असलं तरीही बिग बॉस मात्र मीच जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी नुकतीच टेली मसाला या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना तुम्हाला बिग बॉस कोण जिंकणार असं वाटतं असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सदावर्तेंनी म्हटलं की, एक गुणरत्न लाख गुणरत्न... जनतेने सांगितलंय... पब्लिक डिमांड है भाई पब्लिक डिमांड... म्हणजे मीच बिग बॉस जिंकणार असा विश्वास गुणरत्न सदावर्तेंनी बोलून दाखवला आहे. त्यावर म्हणजे तुम्ही पुन्हा घरात जाणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर सदावर्ते म्हणाले की, जरुर जरुर जरुर...!
सदावर्तेंनी सांगितला लव्ह मॅरेजचा किस्सा
बिग बॉसच्या घरात गुणरत्न सदावर्ते मल्लिका शेरावतसोबतही थिरकताना दिसले, त्यावर जयश्री पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. तुम्हाला यावर जेलसी झाली नाही का? असा प्रश्न जयश्री पाटील यांना विचारला. त्यावर उत्तर देताना गुणरत्न सदावर्ते यांनी जयश्री पाटील यांच्या वडिलांविषयी भाष्य केलंय. गुणरत्न सदावर्ते यांनी टेली मसालाच्या मुलाखतीमध्ये म्हटलं की, 'ये लोखंडे हे...अंडरवर्ल्डसे पढाई हैं... इनका बाप इनसे भी ज्यादा लोखंड था...आमच्या रिलेशनला पाच ते सात वर्ष झाल्यानंतरही हिचा बाप म्हणायचा की... अरे जयश्री शादी की कोई जरुरत नहीं हैं..चल निकल मजे करेंगे गाँव में... एवढ्या खुल्या विचारांची आहे ही...'
सदावर्तेंच्या एन्ट्रीवर हायकोर्टाची नाराजी
दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतल्यानंतर हायकोर्टाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. त्या याचिकेवर सुनावणी देखील सुरु आहे. पण त्याचवेळी गुणरत्न सदावर्ते हे बिग बॉसच्या घरात जाऊन बसल्याने हायकोर्टाने चांगलच सुनावलं.