Friendship Day 2022 Marathi Movie : मैत्रीच्या नात्याला कशाचेही बंधन नसते. मैत्रीचं नातं म्हणजे जगातील एक सुंदर नातँ. यात ना वयाची मर्यादा असते, ना सीमेचं बंधन. याच आपल्या आयुष्यातील खास नात्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आजचा दिवस अर्थात ‘मैत्री दिन’ (Friendship Day) साजरा केला जातो. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिन साजरा केला जातो. या दिवस सगळेच दोस्त मंडळी आपल्या जिवलग मित्रमैत्रीणीना भेटवस्तू देतात. वेळ प्रसंग काहीही असो, आपलेच मित्रच नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतात. अशाच या खास नात्यावर मनोरंजन विश्वात देखील अनेक चित्रपट देखील बनले आहेत. अगदी 1978च्या ‘दोस्त असावा असा’पासून ते नव्या पिढीच्या ‘दुनियादारी’पर्यंत अनेक चित्रपटातून मैत्रीच्या या अनमोल बंधनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. आजच्या या मैत्री दिनानिमित्ताने ‘हे’ काही खास मराठी चित्रपट आवर्जून पाहायलाच हवेत...


दोस्त असावा तर असा


अभिनेते रमेश देव, श्रीकांत मोघे, देवेन वर्मा, राजा मयेकर अभिनित ‘दोस्त असावा तर असा’ या चित्रपटात मैत्रीचा एक वेगळा अध्याय प्रेक्षकांना पाहायला मिळाला. तीन भावांच्या समृद्ध घरात वडिलांच्या जाण्याने एक वादळ निर्माण होते. दिवंगत वडील भलं मोठं कर्ज मुलांच्या नावाने मागे सोडून जातात. अशातच हे सुखी घर उध्वस्त होतं. वडिलांची संपत्ती दोन भाऊ आपापसांत वाटून घेतात आणि तिसऱ्या भावाला वाऱ्यावर सोडतात. अशा वेळी त्याच्या मदतीला धावून येतो तो त्याचा मित्र. हा मित्रच आपल्या मित्राला सगळ्या संकटातून बाहेर काढतो आणि पुन्हा एकदा कुटुंबाला एकत्र आणतो.


दुनियादारी


‘यारा फ्रेंडशिपचा खेळ सारा...’ या गाण्याप्रमाणेच या चित्रपटात मैत्री आणि प्रेम याभोवती गुंफलेली कथा दाखवण्यात आली आहे. ‘दुनियादारी’ हा चित्रपट मराठी मनोरंजन विश्वातील एक उत्कृष्ट कलाकृती ठरला. मैत्री आणि प्रेमाची ही कहाणी सांगणारा हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला. ही कथा अशा मित्रांची आहे, जे एकमेकांशी भांडतातही आणि तितकेच एकमेकांवर प्रेम देखील करतात. चित्रपटातील पात्रे सुहास शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी’ नावाच्या कादंबरीवर आधारित आहेत.


क्लासमेट्स


आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'क्लासमेट्स' या चित्रपटामध्ये अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सुशांत शेलार, सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ चांदेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 'क्लासमेट्स' या मल्याळम चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. महाविद्यालयीन दिवसांच्या मैत्रीवर आधारित हा चित्रपट आहे. 20 वर्षांनंतर पुन्हा एकत्र जमलेले मित्र-मैत्रिणी, कॉलेजच्या दिवसांत घडलेल्या घटनांचा फ्लॅशबॅक, दोन गटांतील वैर आणि एक प्रेमकहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट प्रत्येकाला महाविद्यालयीन दिवसांची नक्कीच आठवण करून देतो.


सावरखेड एक गाव


आयुष्यातील कठीण प्रसंगात खरे मित्र एकमेकांच्या पाठीशी कसे उभे राहतात याचे उत्तम उदाहरण या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. राजीव पाटील दिग्दर्शित हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाची कथा घडते सावरखेड नावाच्या एका गावामध्ये, ज्याला शासनाने आदर्श गाव म्हणून बक्षीस दिले आहे. परंतु लवकरच गावात विचित्र आणि अनपेक्षित घटना घडू लागतात. या चित्रपटात गाव वाचवण्यासाठी सर्व मित्र कसे एकत्र येतात हे पाहण्यासारखे आहे.


धडाकेबाज


लक्ष्य, महेश आणि बाप्पा अशा या तीन मित्रांची ही कथा ‘धडाकेबाज’ या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात हे तीनही मित्र गुन्हेगारीसोडून लोकांची मदत करण्याचे ठरवतात. आपल्या जीवाची बाजी लावत हे तिन्ही मित्र शिवापूरला गुन्हेगारी मुक्त करतात. या चित्रपटातील कवट्या महाकाल हा खलनायक प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला आहे. या चित्रपटातील ‘ही दोस्ती तुटायची नाय’ हे गाण आणि गाण्यातील प्रसंग पाहिल्यावर आजही प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू तरळतात.


महत्वाच्या बातम्या :