Vice President Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी संध्याकाळी नवनिर्वाचित उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांची भेट घेतली आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. भाजप (BJP) अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनीही धनखड यांची केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Vice President Election) धनखड यांना विजयी घोषित केल्यानंतर लगेचच या बैठका झाल्या. धनखड यांना 528 तर विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांना 182 मतं मिळाली.


याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन केलं. या निवडणुकीत जगदीप धनखड 528 मतांनी विजयी झाले आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण 725 मतं पडली. त्यापैकी 710 मतं वैध तर 15 मतं अवैध आढळून आली. आता जगदीप धनखड हे देशाचे 14 वे उपराष्ट्रपती असतील. धनखड देशाचे 14वे उपराष्ट्रपती म्हणून 11 ऑगस्टला शपथ घेतील. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपणार आहे. 



लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह यांनी दिलेल्या माहतीनुसार, धनखड यांना 725 मतांपैकी 528 मतं मिळाली. 346 मतांनी त्यांचा विजय झाला आहे. तर 15 मते अवैध ठरली आहेत. विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना 182 मतं मिळाली. उपराष्ट्रपतीपदासाठी 92.94 टक्के मतदान झालं आहे.  


उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 725 खासदारांनी मतदान केले आहे. टीएमसीच्या 34, भाजपच्या दोन, शिवसेनेच्या दोन आणि बीएसपीच्या एका खासदाराने मतदान केले नाही.  सनी देओल विदेशात आणि संजय धोत्रे हॉस्पिटलमध्ये असल्यानं मतदान केले नाही. शिवसेनेकडून अरविंद सावंत, विनायक राऊत, गजानन कीर्तीकर, संजय जाधव, राजन विचारे हे देखील मतदानासाठी अनुपस्थित होते. 


प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी जल्लोष


NDA उमेदवार जगदीप धनखड यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी भाजप नेते संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तर विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांनीही जगदीप धनखड यांचे विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. त्यांनी ट्वीट केलं की, "उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल धनखडजींचे अभिनंदन. या निवडणुकीत मला मतदान करणाऱ्या सर्व विरोधी पक्षांचे नेते आणि खासदारांचे मी आभार मानू इच्छिते."


अमित शाह म्हणाले, हा तर शेतकरी पुत्राचा विजय 


यासोबतच गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनीही जगदीप धनखड यांचं अभिनंदन केलं. "शेतकरी पुत्र जगदीप धनखड यांची उपराष्ट्रपतीपदी निवड होणं ही संपूर्ण देशासाठी आनंदाची बाब असल्याचं अमित शहा म्हणाले. प्रदीर्घ काळापासून सार्वजनिक जीवनात ते जनतेशी जोडले गेले आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा वरिष्ठ सभागृहाला नक्कीच होईल."