PV Narasimha Rao Web Series : केंद्र सरकारकडून माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव ( PV Narasimha Rao) यांना देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. पीव्ही नरसिंह राव यांनी 1991 ते 1996 या काळात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव करत त्यांना या सर्वेच्च सन्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी सरकारने अचानक घेतलेल्या या निर्णयाबाबत जनतेच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच आता अहा स्टुडिओ आणि ॲप्लॉज एंटरटेनमेंटने पीव्ही नरसिंह राव यांच्यावर बायोपिक बनवण्याची घोषणा केली आहे.
पीव्ही नरसिंह राव यांचा हा बायोपिक प्रसिद्ध लेखक विनय सीतापती यांच्या 'हाफ लायन' या पुस्तकावर आधारित आहे. या वेब सीरिजमध्ये पीव्ही नरसिंह राव यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा 1990 च्या दशकाची गोष्ट सांगितली जाणार आहे. पीव्ही नरसिंह राव हे देशाचे 9 वे पंतप्रधान होते. या पदावर असताना त्यांनी देशात अनेक आर्थिक सुधारणा केल्या होत्या.
सिरिजमध्ये कोणता अभिनेता झळकणार?
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते प्रकाश झा नरसिंह राव यांच्यावर वेब सीरिज बनवणार आहेत. याआधी प्रकाश झा यांनी सत्याग्रह, गंगाजल, आश्रम यांसारख्या वेबसिरीज बनवल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या वेब सीरिजशी संबंधित माहिती देताना आम्ही या नव्या प्रोजेक्टविषयी फार उत्सुक आहोत. या वेब सीरिजमध्ये पीव्ही नरसिंह राव यांची भूमिका कोणता अभिनेता साकारणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाहीये. तसेच या वेबसीरिजमधील कलाकरांबाबतही कोणतीही माहिती देण्यात आली नाहीये. त्यामुळे सध्या या भूमिकेसाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरु आहे.
याआधीही बॉलिवूडमध्ये अटल बिहारी वाजपेयी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही बायोपिक बनवण्यात आले आहेत. माजी पंतप्रधानांवर बनलेल्या या बायोपिकला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता ही वेब सिरीज पीव्ही नरसिंह राव यांच्या खऱ्या कथेला कितपत न्याय देऊ शकते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.