Dharmaveer 2 : धर्मवीर-2 सिनेमा हिंदीतही प्रदर्शित होणार, मंगेश देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केली घोषणा
Dharmaveer 2 : धर्मवीर 2 हा सिनेमा हिंदीमध्ये देखील प्रदर्शित करण्यात येणार आहे.त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच नाही,तर संपूर्ण देशभरात हा सिनेमा प्रदर्शित केला जाईल.
Dharmaveer 2 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये 'धर्मवीर 2' (Dharmaveer 2) सिनेमाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे.यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह कलाक्षेत्रातीलही अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र भूषण अशोक सराफ,सचिन पिळगांवकर,महेश कोठारे, बॉबी देओल यांच्यासह सिनेमातील कलाकार देखील उपस्थित होते. मंगेश देसाई (Mangeg Desai) या सिनेमाचे निर्माते असून या सोहळ्यात त्यांनी एक महत्त्वाची घोषण केली.
धर्मवीर-2 सिनेमा हा सिनेमा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच नाही,तर संपूर्ण देशभरात हा सिनेमा प्रदर्शित केला जाईल. धर्मवीर या सिनेमानंतर धर्मवीर 2 सिनेमाची प्रेक्षकांना बरीच उत्सुकता होती. येत्या 9 ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता या सिनेमात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
शिंदेंच्या उठावाची कहाणी दुसऱ्या भागात?
एकनाथ शिंदे 'धर्मवीर 2' या सिनेमात क्षितिज दाते मुख्यमंत्री म्हणून दिसणार आहे. त्यामुळे शिंदेंच्या उठावाची कहाणी दुसऱ्या भागात उलगडणार का? असा प्रश्न उपस्थित सध्या अनेकांना पडला आहे. तसेच या सिनेमात धर्मवीर-2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असं नाव देण्यात आलं हे. तसेच उद्धव ठाकरे यांचं पात्र असणार की वगळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
धर्मवीर 2' सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केली असून दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी निभावली आहे. अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) दिघे साहेबांची भूमिका साकारत आहे. तसेच क्षितिज दाते हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या सूरत, गुवाहाटी ते मुंबई असा प्रवास या सिनेमात पाहायला मिळणार का याची देखील उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी काय म्हटलं?
मुख्यमंत्री शिंदे यांनी या सिनेमासाठी शुभेच्छा देत म्हटलं की, मी धर्मवीर-2 सिनेमाचं आणि मंगेश देसाई यांचं खूप खूप अभिनंदन करतो. जेव्हा त्यांनी धर्मवीर हा सिनेमा करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी त्यांनी मला या सिनेमासाठी सहकार्य हवं असं म्हटलं. त्यांच्या सिनेमासाठी मदत करणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. कुठल्याही सत्तेचं पद नसताना जनतेच्या हृदयात आनंद दिघेंनी अढळ स्थान निर्माण केलं होतं. आनंद दिघेंचं कार्य हे एका सिनेमात उलगडूच शकत नाही. लोकांपर्यंत ते पोहचूच शकत नाही. त्यामुळे पहिला सिनेमा काढल्यानंतर लोकांना वाटलं आता पुढे काय? आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागातून त्या गोष्टी समोर येणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसाद ओकच्या अभिनयाचंही कौतुक केलं.