जात-पात अन् प्रेमाची गोष्ट, धडक 2 चा ट्रेलर आऊट; तृप्ती डिमरी अन् सिद्धांतची जोडी चर्चेत VIDEO
Dhadak 2 trailer released : 'धडक 2' या रोमँटिक चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी ही जोडी पाहायला मिळत आहे.

Dhadak 2 trailer released : अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिकेतील रोमँटिक ड्रामा चित्रपट धडक 2 चा जबरदस्त ट्रेलर आज 11 जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत बनवलेला ‘धडक 2’ हा 2017 साली आलेल्या ‘धडक’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. पहिल्या भागात ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. 'धडक' चे दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केले होते, तर ‘धडक 2’ चे दिग्दर्शन शाजिया इक्बाल यांनी केले आहे. तब्बल 8 वर्षांनंतर प्रेक्षकांना या चित्रपटाचा पुढचा भाग पाहायला मिळणार आहे. ट्रेलरने प्रदर्शित होताच खळबळ उडवून दिली आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा ट्रेलर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. ट्रेलरमध्ये सिद्धांत आणि तृप्ती यांच्यातील अफाट प्रेम आणि समाजाशी होणारी झुंज दिसून येते.
धडक 2 चा ट्रेलर कसा आहे?
‘धडक 2’ चा ट्रेलर 3.04 मिनिटांचा असून, तो प्रचंड प्रभावी आहे. ट्रेलर पाहून अंगावर काटा येतो. सुरुवातीला नीलेश (सिद्धांत) वर्गात वाचणाऱ्या विधी (तृप्ती) ला म्हणतो, “माझ्यावर प्रेम करतेस ना, तर माझ्यापासून दूर राहा.” यावर विधी उत्तर देते, “का दूर राहू?”
यानंतर कॉलेज लाईफ दाखवलं जातं जिथे निलेशवर त्याच्या जातीच्या आधारावर अन्याय केला जातो. दुसरीकडे विधी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत केवळ नीलेशवर प्रेम करत राहते. ट्रेलरमध्ये निलेशवर होणारा अत्याचार, विधीने प्रेमासाठी केलेला संघर्ष, आणि घर-समाजाकडून मिळणारा विरोध सर्व काही अत्यंत प्रभावी पद्धतीने मांडलेलं आहे. एकूणच हा ट्रेलर पाहिल्यावर प्रेक्षक चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहू लागतात.
चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
ट्रेलरच्या शेवटी ‘अॅनिमल’ फेम सौरभ सचदेवा एका प्रभावी सीनमध्ये दिसून येतात. चित्रपटात आशिष चौधरी, विपिन शर्मा आणि दीक्षा जोशी हे देखील सहाय्यक भूमिकांमध्ये झळकणार आहेत. धर्मा प्रॉडक्शन्स, झी स्टुडिओज आणि क्लाऊड 9 पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार झालेला ‘धडक 2’ हा चित्रपट 1 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. करण जोहरने हा ट्रेलर आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
तब्बू अभिमान वाटावा अशी मराठी बोलली, आभार व्यक्त करताना महेश मांजरेकरांना मिठी मारली VIDEO























