छावा पाहून घरकाम करणारी आशा ताई भारावली, विकी कौशला समोर पाहताच प्रेमाने केलं 'हे' काम; व्हिडीओवर दिग्गजांच्या प्रतिक्रिया!
Chhaava Film : विकी कौशलचा छावा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात लोकांची पसंती मिळत आहे.

Vicky Kaushal Chhaava Film: विकी कौशलच्या छावा या चित्रपटाची सध्या देशभरात चर्चा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने 300 कोटींपेक्षा अधिक रुपये कमवले आहेत. विकी कौशलने या चित्रपटात केलेल्या कामाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. तो जिथे जाईल तिथे त्याचे अभिनंदन केले जात आहे. दरम्यान, एकीकडे छावा चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत असताना दुसरीकडे विकी कौशलने इन्स्टाग्राम खात्यावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी लाईक केले असून अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
छावा चित्रपटाचा बोलबाला
विकी कौशलचा छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारलेला आहे. त्याने छत्रपती संभाजी राजांची भूमिका केलेली आहे. तर दुसरीकडे महाराणी येसुबाई यांची भूमिका रश्मिका मंदानाने केली आहे. विकी कौशलच्या तोडीस तोड असलेला अभिनेता अक्षय खन्ना याने बादशाहा औरंगजेबाची भूमिका केली आहे. या तिघांच्याही कॉमचे देशभरातून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट चांगला गल्ला जमवताना दिसतोय. छावाने आठवड्याभरात 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे.
विकी कौशलने नेमकं काय म्हटलंय?
एकीकडे छावा चित्रपटाची ही घोडदौड चालू असताना दुसरीकडे विकी कौशलने इन्स्टाग्राम खात्यावर अनोखा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एक महिला त्यांची दृष्ट काढताना दिसतेय. तर खुद्द विकी कौशल हा दरवाजात शांतपणे उभा आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना विकी कौशलने एक भावुक कॅप्शनही दिलंय. "आशा ताईंनी मला मोठं होताना पाहिलंय. त्यांनी नुकतेच छावा हा चित्रपट पाहिला आणि माझी नजर काढायचं ठरवलं. उभे राहा. मला तुमची नजर काढायची आहे, असे त्या म्हणाल्या. माझ्याप्रतिचं प्रेम व्यक्त करण्याची ही त्यांची नेहमीची पद्धत आहे. त्या माझ्या आयुष्यात असल्यामुळे मी खूप आनंदी आहे," असं विकी कौशलने कॅप्शनमध्ये म्हटलंय.
View this post on Instagram
विकी कौशलच्या व्हिडीओवर अनेकांच्या प्रतिक्रिया
दरम्यान, विकी कौशलच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक केले आहे. अवघ्या 20 तासांत साधारण 22 लाखांपेक्षा अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. सोबतच अनेक दिग्गज कलाकारांनीही या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता आयुष्मान खुरानाने सुंदर असं म्हटलंय. तर पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी तुम्ही खूप चांगलं काम केलं. विकी जी तुम्हाला 100 वर्षांचं समृद्ध आयुष्य लाभो, असं पौडवाल यांनी म्हटलंय. मराठमोळा कलाकार संतोष जुवेकर यानेदेखील या व्हिडीओवर कमेंट केली आहे. ह्याला म्हणतात प्रेम कमावणं...ह्याला म्हणतात.... इज्जत बढ गई और नजर उतर गई... आई जगदंबा खूप यश देवो राजं .. असं जुवेकरने म्हटलंय.
हेही वाचा :
आता अक्षय खन्नानंतर 'हा' मुरलेला अभिनेता करणार औरंगजेबाची भूमिका; नव्या चित्रपटाची देशभरात चर्चा!























