TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
सलमान खानला मिळालेल्या पत्राचा तपास सुरू; दबंग खानने नोंदवला जबाब
बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले असून त्या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी वांद्रे पोलीस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला होता. सध्या या प्रकरणाचा पोलिस तपास घेत आहेत. मुंबई पोलिसांनी आता सलमान, सलीम खान आणि बॉडी गार्डसह त्यांच्या संपर्कातील काही लोकांचा जबाब नोंदवला आहे.
‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड, 11 दिवसांत विक्रमी कमाई!
‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. लेखक-दिग्दर्शक प्रविण तरडे (Pravin Tarde) यांनी या चित्रपटात ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’ यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील धुमाकूळ घातला आहे. इतिहासाचं सुवर्ण पान उलगडणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 18.20 कोटींची कमाई केली आहे.
‘गोकुळधाम सोसायटी’मध्ये होणार ‘दयाबेन’ची वापसी!
छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. या मालिकेत ‘तारक मेहता’ साकारणारे अभिनेता शैलेश लोढा यांनी हा शो सोडल्याची चर्चा सुरु आहे. तर, दुसरीकडे ‘बबिता’ साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्तादेखील मालिकेचा निरोप घेणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या सगळ्या चर्चा सुरु असतानाच मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक कलाकार मालिका सोडण्याच्या वाटेवर असताना आता मालिकेत ‘दया बेन’ची वापसी होणार आहे.
कोरियन सिरीज 'ऑल ऑफ अस आर डेड'च्या दुसऱ्या सीझनची घोषणा, नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित!
प्रेक्षकांना लवकरच कोरियन वेब सिरीज ‘ऑल ऑफ अस आर डेड’चा दुसरा सीझन ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. या वेब सिरीजच्या पहिल्या सीझनला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर नेटफ्लिक्सने ‘ऑल ऑफ अस आर डेड’चा दुसरा सीझन जाहीर केला आहे. या सिरीजच्या पहिल्या सीझनमध्ये दाखवलेल्या झॉम्बी कथेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले होते. आता या सिरीजच्या दुसऱ्या सीझनची घोषणा ऐकून चाहतेही खुश झाले आहेत.
सम्राट पृथ्वीराजनंतर खिलाडी कुमार करणार करण जोहरचा सिनेमा; सी शंकरन नायर यांचा बायोपिक
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. 'सम्राट पृथ्वीराज'नंतर अक्षय कुमार आता करण जोहरच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात अक्षय कुमारसोबत अनन्या पांडेदेखील दिसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जितेंद्र कुमारच्या 'जादूगर'चा फर्स्ट लूक आऊट, नेटफ्लिक्सवर होणार रिलीज
पंचायत फेम अभिनेता जितेंद्र कुमारचा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'जादूगर' असे या सिनेमाचे नाव आहे. 15 जुलैला हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा क्रीडाविषयक सिनेमा आहे.
'कोण होणार करोडपती'च्या मंचावर येणार काजोल आणि तनुजा; उलगडणार मायलेकींचे बंध
'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचे नवे पर्व नुकतेच सुरू झाले आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच आठवड्यात विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि लाडकी अभिनेत्री काजोल उपस्थित राहणार आहे. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर पहिल्यांदाच या मायलेकीचा अनोखा बंध पाहायला मिळणार आहे. एबल डिसेबल ऑल पीपल टुगेदर' या संस्थेसाठी त्या 'कोण होणार करोडपती' हा खेळ खेळणार आहेत.
'धाकड'नंतर 'सम्राट पृथ्वीराज' बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला; 'भूल भुलैया 2' ठरतोय सुपरहिट
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. 3 जूनला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण बॉक्स ऑफिसवर मात्र हा सिनेमा अयशस्वी ठरला आहे. आतापर्यंत या सिनेमाने फक्त 44.40 कोटींची कमाई केली आहे.
स्वाभिमान मालिकेत पल्लवी आणि शांतनू अडकले विवाहबंधनात
स्वाभिमान या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेतील पल्लवी आणि शांतनू यांच्या लग्नाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहात होते. तो आता क्षण अखेर आलाय. पल्लवी आणि शांतनू यांचा विवाह सोहळा संपूर्ण कुटुंबाच्या साक्षीने पार पडला आहे. लग्नातल्या दोघांच्या पारंपरिक लूकला विशेष पसंती मिळत आहे. पल्लवी आणि शांतनूच्या आयुष्यात जरी आनंदाचे क्षण आले असले तरी मोठ्या आईच्या मनात मात्र नवं कटकारस्थान सुरू आहे.
'बॉस माझी लाडाची' मालिकेत मिहीर आणि राजेश्वरी अडकणार लग्नबंधनात
'बॉस माझी लाडाची' या मालिकेत बॉस आणि मिहीर यांच्यात शाब्दिक वाद, प्रेमाचं नाटक हे सगळंच प्रेक्षकांना बघायला मजा येत होती. बॉस आणि मिहीर यांचं लग्न एक डील असलं, तरीही इतर लग्नांप्रमाणेच सगळे विधी याही लग्नात बघायला मिळतील.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.























