(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sunil Lahri on BJP Ayodhya : अयोध्येत भाजपचा पराभवाने 'रामायण'मधील लक्ष्मणचा संताप, हिंदू समुदाय म्हणजे....
Sunil Lahri on BJP Ayodhya : प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपच्या या पराभवावर रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या सुनील लहरी यांनी अयोध्येतील मतदारांवर संताप व्यक्त केला आहे.
Sunil Lahri on BJP Ayodhya : लोकसभा निवडणूक 2024 चे (Lok Sabha 2024) निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वात एनडीए (BJP NDA) सरकार स्थापन करणार आहे. मात्र, भाजपलाही स्पष्ट बहुमत नाही. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपच्या या पराभवावर रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या सुनील लहरी (Sunil Lahri) यांनी अयोध्येतील मतदारांवर संताप व्यक्त केला आहे. अयोध्येतून भाजपच्या लल्लू सिंह यांचा पराभव करत समाजवादी पक्षाचे उमेदवार अवदेश प्रसाद विजयी झाले.
सुनील लहरींनी व्यक्त केला संताप...
सुनील लाहिरी यांनी बुधवारी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अयोध्या निवडणुकीच्या निकालावर निराशा व्यक्त केली. अयोध्येसारख्या पवित्र शहरातील जनतेने त्यांच्या राजाचा विश्वासघात केला असल्याचा आरोप सुनील लाहिरी यांनी केला. सुनील यांनी आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटले की,'आम्ही विसरलो की हा तोच अयोध्यावासी आहे, ज्यांनी वनवासातून परतल्यानंतर सीता मातेवर संशय व्यक्त केला होता. हिंदू हा असा समाज आहे, प्रत्यक्षात देव जरी प्रकट झाला तरी त्याला नाकारतील, स्वार्थी आहेत.
राजासोबत केला विश्वासघात...
सुनील लाहिरी पुढे लिहितात, 'इतिहास साक्षी आहे की अयोध्येतील जनतेने नेहमीच त्यांच्या खऱ्या राजाशी विश्वासघात केला आहे. सुनील लाहिरी यांनी आणखी एक पोस्ट शेअर करून संताप व्यक्त करत म्हटले की, 'अयोध्यावासियांनो, तुमच्या महानतेला सलाम! तुम्ही माता सीतेला सोडले नाही, ज्यांनी रामाला तंबूमधून बाहेर काढून भव्य मंदिरात बसवले, त्यांचा विश्वासघात करणे ही किती मोठी गोष्ट आहे. संपूर्ण भारत तुम्हाला चांगल्या नजरेने कधीही पाहणार नाही.
अरुण गोविल यांना विजयाच्या शुभेच्छा
सुनील लाहिरी यांच्या पोस्टवरून ते भाजपच्या पराभवाने नाराज असल्याचे दिसते. तर, रामायणमध्ये रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांचा मेरठमधून विजय झाला. अरुण गोविल यांना विजयाबद्दल सुनील शुभेच्छा दिल्यात. अरुण गोविल यांनी समाजवादी पक्षाच्या सुनीता वर्माच्या 10 हजार 585 मतांनी विजय मिळवला.