Har Har Mahadev : मराठमोळा अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) एक अभ्यासू अभिनेता असून नेहमीच तो त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडत असतो. आज सुबोध पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुबोधचा 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर आऊट झाले आहे. 


'हर हर महादेव' या सिनेमाचं पोस्टर शेअर करत सुबोधने लिहिलं आहे,"अखंड स्वराज्यचं स्वप्न पाहणारा तो राजा रयतेचा, मराठी रक्तासाठी लढणारा तो राजा रयतेचा, मराठी रक्तासाठी लढणारा तो लेक जिजाऊचा, गनिमाच्या चिंध्या करणारा तो चालक भवानी तलवारीचा, एकमेव जो छत्रपती झाला तो भक्त जगदंबेचा". 


सुबोधने पुढे लिहिलं आहे,"आता अभिमानाने मोठ्या पडद्यावर 'हर हर महादेव' ही शिवगर्जना घुमणार. पहिल्यांदाच मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू आणि कन्नड या पाच भाषांत येत्या दिवाळीत 25 ऑक्टोबरपासून संपूर्ण देशात सिनेमागृहात प्रदर्शित होणार". 






छत्रपती शिवरायांचं कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावं या उद्देशाने 'हर हर महादेव' हा भव्य दिव्य सिनेमा मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगु आणि कन्नड भाषेतून प्रदर्शित करण्याचा निर्णय झी स्टुडिओजने घेतलेला आहे. अभिजीत देशपांडेने या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 


'हर हर महादेव' सिनेमाविषयी सुबोध भावे म्हणाला,"रयतेच्या राजाची भूमिका साकारायला मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे असे मी मानतो. एक अभिनेता म्हणून आपल्याला कायम काही तरी आव्हानत्मक भूमिका करायला मिळाव्यात अशी कायम इच्छा असते. माझ्यासाठी 'ड्रीम रोल' असलेली ही भूमिका केवळ आव्हानात्मकच नाही तर एक फार मोठी जबाबदारी आहे याची जाणीव मला आहे. हे शिवधनुष्य पेलण्याचा मी इमानेइतबारे प्रयत्न केलेला आहे".


संबंधित बातम्या


Har Har Mahadev : 'हर हर महादेव' शिवगर्जना घुमणार रुपेरी पडद्यावर; सुबोध भावेने शेअर केलं पोस्टर


Lata Mangeshkar : 'भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्याल'याचं मुख्यमंत्राच्या हस्ते उद्घाटन