Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज 'आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे' (Bharat Ratna Lata Dinanath Mangeshkar International Music College) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन झाले. त्यावेळी लता दीदींच्या आठवणींना उजाळा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)म्हणाले,"दीदी आपल्या सोबत नसल्या तरी आपल्या सोबत कायम आहेत".


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,"दीदी आपल्या सोबत नसल्या तरी आपल्या सोबत कायम आहेत. एक दैवी शक्ती त्यांच्यात होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. लता दीदींचा आवाज कानावर पडत नाही असा एकही दिवस जात नाही". 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,"जगातील प्रत्येकाचं लक्ष वेधेल असं आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय बनवण्यात येत आहे. दीदी सर्वांना भुरळ घालणाऱ्या होत्या. ईश्वराचा अंश दिदींमध्ये आपल्याला जाणवायचा. त्यांच्या नावाने आता काम करण्याची संधी मिळते यापेक्षा मोठी गोष्ट काही नाही". 


गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज जयंती आहे. आज लता दीदींच्या जयंती निमित्त 'आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे' मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्धाटन झाले आहे. या महाविद्यालयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना आजपासून सुरुवात झाली आहे. पु.ल. देशपांडे अकादमीमध्ये तात्पुरत्या काळासाठी हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. महाविद्यालयाची वास्तू तयार झाल्यानंतर कलिनामध्ये महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे". 


लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात सुरू करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांमध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम, भारतीय बासरी वादन, तबला वादन, सतार वादन, हार्मोनियम/कीबोर्ड वादन, ध्वनी अभियांत्रिकी अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे. 


महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी गायन व वादन या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांस गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आज रविंद्र नाट्यमंदीर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन 2020 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना तर सन 2021 चा पुरस्कार ज्येष्ठ बासरीवादक पं.हरीप्रसाद चौरसिया यांना प्रदान करण्यात आला.


संबंधित बातम्या


Lata Mangeshkar : आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयांतील प्रमाणपत्र अभ्यासक्रम 28 सप्टेंबरला होणार सुरू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


Lata Mangeshkar Biography : लता मंगेशकरांनी पाच हजाराहून अधिक गाणी गायली, पण त्यांचं पहिलंच गाणं रिलीज झालं नाही, वाचा काय आहे हा किस्सा