Har Har Mahadev : 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून या सिनेमात कोणते कलाकार असतील याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. नुकतचं या सिनेमाचं एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'हर हर महादेव' या सिनेमात बहुआयामी अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे.


छत्रपती शिवरायांच्या कार्याची ख्याती आणि कीर्ती ही केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर पसरलेली आहे. देशभरातील लोकांसाठी आजही शिवाजी महाराज हे प्रेरणास्रोत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन या सिनेमाच्या माध्यमातून छत्रपतींचं कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावं या उद्देशाने हा भव्य दिव्य सिनेमा मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगु आणि कन्नड भाषेतून प्रदर्शित करण्याचा निर्णय झी स्टुडिओजने घेतलेला आहे. 






'हर हर महादेव' या सिनेमात अनेक नामवंत कलाकारांची मांदियाळी असणार आहे. त्यातील एक प्रमुख भूमिकेतील नाव म्हणजे सुबोध भावे. या भूमिकेबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला,"छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की मनात आपसूकच आदराची आणि अभिमानाची भावना निर्माण होते. केवळ मराठी माणूसच नव्हे तर इतर भाषिकांसाठीही अखंड प्रेरणेचं उर्जास्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा या रयतेच्या राजाची भूमिका साकारायला मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे असे मी मानतो. एक अभिनेता म्हणून आपल्याला कायम काही तरी आव्हानत्मक भूमिका करायला मिळाव्यात अशी कायम इच्छा असते. माझ्यासाठी 'ड्रीम रोल' असलेली ही भूमिका केवळ आव्हानात्मकच नाही तर एक फार मोठी जबाबदारी आहे याची जाणीव मला आहे. हे शिवधनुष्य पेलण्याचा मी इमानेइतबारे प्रयत्न केलेला आहे. दिवसाअंती आनंद आणि समाधान देणाऱ्या काही भूमिका असतात. या भूमिकेने मला तो आनंद ते समाधान आणि जगण्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन दिला आहे". 


अभिजित देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनाने सजलेला 'हर हर महादेव'  हा सिनेमा आहे. येत्या दिवाळीत पाच भारतीय भाषांमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणारा 'हर हर महादेव' हा पहिलाच मराठी सिनेमा ठरणार आहे. हा सिनेमा अनेक बॉलिवूड सिनेमांना टक्कर देणारा ठरणार आहे. 


संबंधित बातम्या


Har Har Mahadev : पाच भारतीय भाषांमध्ये घुमणार शिवगर्जना ; 'हर हर महादेव' चित्रपट मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नडमध्ये होणार प्रदर्शित


Har Har Mahadev : 'हर हर महादेव!'; झी स्टुडिओची प्रेक्षकांना खास भेट, राज ठाकरेंच्या आवाजात घुमली महागर्जना