'दगडफेकीच्या घटनेत मी जखमी झालो ही केवळ अफवा', अभिनेता इमरान हाश्मीने पोस्ट लिहिती दिली माहिती!
Emraan Hashmi : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi ) सध्या जम्मू-काश्मीरमध्ये त्याच्या आगामी 'ग्राउंड झिरो' (Ground Zero) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
Emraan Hashmi : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) सध्या जम्मू-काश्मीरमध्ये त्याच्या आगामी 'ग्राउंड झिरो' (Ground Zero) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पहलगाममध्ये या चित्रपटाचे शूटिंगचे काम सुरू आहे. मात्र, इथे इमरान हाश्मीला दगडफेक झेलावी लागली आहे. इमरान हाश्मी शूटिंग संपवून सेटवरून बाहेर पडला, तेव्हा काही लोकांनी त्याच्यावर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे.
‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाचे शूटिंग संपवून कलाकार फिरायला बाहेर पडले, त्यानंतर काही लोकांनी इमरान हाश्मी आणि त्याच्यासोबत असणाऱ्या इतरांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी पहलगाम पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दगडफेक करणाऱ्यांवर कलम 147, 148, 370, 336, 323 लावण्यात आले आहेत.
नेमकं काय झालं?
संध्याकाळी शूटिंग संपवून, इमरान हाश्मी (Emraan Hashmi) चित्रपटाच्या उर्वरित टीमसह पहलगामच्या मुख्य बाजारपेठेकडे जात होता. त्यानंतर अचानक काही अज्ञात लोकांनी अभिनेत्यासोबत उपस्थित सर्व लोकांवर हल्ला केला आणि सर्वांनी त्याच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या प्रकरणाचा एफआयआर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. दगडफेक करणाऱ्यांवर कलम 147, 148, 370, 336, 323 लावण्यात आले आहेत. याप्रकरणी अनंतनाग पोलिसांनी एका व्यक्तीची ओळख पटवून त्याला अटक केली आहे. समोर आलेल्या निवेदनात पोलिसांनी म्हटले आहे की, या व्यक्तीची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली आहे.
मी पूर्णपणे ठीक! : इमरान हाश्मी
दगडफेक झाल्याच्या वृत्तानंतर इमरानचे चाहते काळजीत पडले होते. मात्र, अभिनेता इमरान हाश्मी याने स्वतः ट्विट करत आपण सुखरूप असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिले की, 'काश्मीरमधील लोक अतिशय प्रेमळ आहेत. श्रीनगर आणि पहलगाममध्ये शूटिंग करताना मला खूप आनंद झाला. दगडफेकीच्या घटनेत मी जखमी झाल्याची बातमी चुकीची आहे.'
पुन्हा चित्रीकरण सुरु
बॉलिवूडसाठी सुरुवातीपासूनच काश्मीर ही पहिली पसंती असायची. कलम 370 हटवल्यानंतर सरकारने 2021च्या अखेरीस लागू केलेल्या चित्रपट धोरणामुळे चित्रपट उद्योगाला काश्मीरच्या खोऱ्यात चित्रीकरणाची परवानगी मिळणे अधिक सोपे झाले आहे. त्याचबरोबर विविध प्रकारच्या सुविधाही दिल्या जात असल्याने येथील चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करणे देखील सोपे झाले आहे.
इमरान नव्या चित्रपटात व्यस्त!
इमरान हाश्मीचा (Emraan Hashmi ) 'ग्राउंड झिरो' हा चित्रपट सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानावर आधारित आहे. याआधी चित्रपटाचे शूटिंगही श्रीनगरमध्ये झाले होते. यादरम्यान अभिनेता 14 दिवस श्रीनगरमध्ये होता. 'ग्राउंड झिरो'बद्दल बोलायचे झाले तर, तेजस देऊस्कर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात इमरानशिवाय सई ताम्हणकर आणि झोया हुसैन दिसणार आहेत. 'ग्राउंड झिरो' व्यतिरिक्त इमरान हाश्मी अक्षय कुमारच्या 'सेल्फी' आणि 'टायगर 3'मध्ये सलमान खानसोबत दिसणार आहे. 'टायगर 3' मधील इमरानचे पात्र निगेटिव्ह असणार असल्याचा दावा केला जात आहे.
हेही वाचा :