Defamation Suit Case: शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा शर्लिन चोप्राविरोधात 50 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला
Defamation Suit Case: अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी शर्लिन चोप्राविरोधात 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.
Defamation Suit Case: अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी शर्लिन चोप्राविरोधात 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीचे वकील प्रशांत पाटील यांनी शर्लिन चोप्राला नोटीस पाठवून एका आठवड्याच्या आत माफी मागण्यास सांगितले आहे. जर शर्लिन चोप्राने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीची माफी मागितली नाही तर 50 कोटींचा मानहानीचा खटला आणि फौजदारी खटला राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी दाखल करणार आहे.
शर्लिन चोप्रा हिने राज कुंद्रावर लैंगिक छळ आणि फसवणुकीचा आरोप करत मीडिया चॅनेल्सला मुलाखती दिल्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, शर्लिनने त्यांच्याविरोधात अपमानजनक टिप्पणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, "शर्लिन चोप्रा यांनी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा यांच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे, निराधार आणि कोणत्याही पुराव्याशिवाय आहेत. शर्लिन चोप्राने केवळ बदनामी आणि खंडणीच्या हेतूने आरोप केले आहेत."
ते पुढे म्हणाले की जेएल स्ट्रीम अॅपशी शिल्पा शेट्टीचा कोणताही संबंध नाही. शर्लिनने शिल्पा शेट्टीचं नाव घेण्यामागे केवळ वाद निर्माण करणे आणि माध्यमांचे लक्ष वेधून घेण्याचा उद्देश आहे.
राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी 19 जुलैला अश्लील चित्रपटांची निर्मिती केल्याप्रकरणी अटक केली होती. राज कुंद्रा सुमारे दोन महिने तुरुंगात होता. त्यानंतर त्याला सप्टेंबरमध्ये जामीन मिळाला. मालाड पश्चिममध्ये मालवणी पोलिसांनी एका बंगल्यावर छापा टाकून अॅपवर अश्लील साहित्य दाखवल्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश केला. मात्र, राज कुंद्रा यांनी जामिनादरम्यान आरोप नाकारले होते.
काय आहेत शर्लिनचे आरोप?
शर्लिनने राज कुंद्राच्या जेएल स्ट्रीम कंपनीसाठी 3 व्हिडिओ शूट केले, पण तिला सांगितल्याप्रमाणे पैसे दिले गेले नाहीत. प्रत्येक व्हिडीओसाठी शर्लिनला 16 लाख म्हणजेच 3 व्हिडीओसाठी 48 लाख दिले जाणार होते, पण शर्लिनचा दावा आहे की आजपर्यंत तिला तिच्या बोल्ड व्हिडिओंसाठी एक पैसाही दिला गेला नाही. शर्लिनने जुहू पोलीस ठाण्यात तसेच राज कुंद्रावर दोन वर्षांपूर्वी शर्लिनच्या घरी लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे.
शर्लिनने दावा केला आहे की दोन वर्षांपूर्वी राज कुंद्राच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्यानंतर राज कुंद्रा तिला भेटला होता आणि तिला त्याच्या फोनवर एक नंबर दाखवला होता की हा (रणजीत बिंद्रा) माणूस डी कंपनी म्हणजेच दाऊदचा माणूस आहे आणि जर तिने लैंगिक शोषण प्रकरणाची तक्रार मागे घेतली नाही तर मग डी कंपनीचा माणूस तिच्यासोबत काहीही करू शकतो.
शर्लिन चोप्रा म्हणते की भीतीमुळे आणि सिंगल मुलगी असल्याने तिने राज कुंद्राविरोधातील लैंगिक शोषणाची तक्रार पोलीस ठाण्यात जावून मागे घेतली होती. शर्लिन म्हणाली की तिने शिल्पा शेट्टीसोबत देखील या विषयावर चर्चा केली होती. त्यावेळी शिल्पा म्हणाली, की "माझे पती शक्ती कपूर आहे का?..."
शर्लिनने सांगितले की, ज्या तीन व्हिडीओत काम करण्यासाठी तिला पैसे दिले नाही. त्या कामासाठी तयार करण्यासाठी राज कुंद्रा 10 महिने प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याने सांगितले की शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी देखील जेएल स्ट्रीम कंपनीचा भाग आहेत.
शर्लिनने एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की, जर राज कुंद्रा याने व्यावसायिक करार केला असेल तर त्याने एका व्यावसायिकासारखे वागायला हवे होते आणि तिला कामासाठी मोबदला मिळायला हवा होता, परंतु राजने तिची फसवणूक केली.