गँगस्टरच्या 'त्या' सीनसाठी ‘शाहरुख मटणाची हाडं चोखत होता’.. दिग्दर्शकानं शाहरुखची एक मजेशीर आठवण सांगितली; ‘रईस’मध्ये कसा बनला मियाँभाई?
त्याच्यासोबत काम करणं म्हणजे एक कोलॅबोरेटिव्ह एक्सपीरियन्सअसतो. तो चर्चेत पूर्णपणे गुंततो, जगभरात काय घडतंय याची माहिती ठेवतो, असं ही ते म्हणाले.

Shahrukh Khan: बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आज (2 नोव्हेंबर) आपला 60वा वाढदिवस (SRK 60th Birthday) मोठ्या थाटामाटात साजरा करत आहे. या खास दिवशी शाहरुखने चाहत्यांना एक गिफ्ट दिलं आहे. त्याच्या येऊ घातलेल्या ‘किंग’ या चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करत, ही फिल्म पुढच्या वर्षी थिएटरमध्ये रिलीज होणार असल्याचं जाहीर केलं. बॉलीवूडचा बादशाह शाहरुखच्या वाढदिवशी सिनेसृष्टीतील अनेकांनी त्याच्याविषयीच्या आठवणी आणि काहींनी त्याचे सिक्रेट्स शेअर केले आहेत. (Bollywood)
‘रईस’चे दिग्दर्शक राहुल ढोलकिया (Rahul Dholakiya) यांनी शाहरुखच्या काम करण्याच्या शैलीबद्दल,माणूस म्हणून असणारं मोठेपण, काम करताना असणारं समर्पण सांगताना शूटिंगमधल्या काही खास आठवणी शेअर केल्या. या खास संभाषणात त्यांनी एक मजेशीर किस्सा सांगितला, जेव्हा शाहरुखच्या टीमनं त्यांना एका सीनसाठी फॅन्सी चिकन द्यायचं ठरवलं होतं, तेव्हा शाहरुखनं चक्क घरगुती मटण खाण्यास पसंती दिली. ‘रईस’मध्ये शाहरुख खानने गुजरातमधील एका गँगस्टरची भूमिका साकारली होती, ज्याचे अंडरवर्ल्डशीही संबंध दाखवले होते.
बनिये का दिमाग, मियाँ भाई की डेयरिंग!
शाहरुखसोबतच्या पहिल्या नरेशनचा अनुभव सांगताना राहुल म्हणाले, “मी पहिल्यांदा नरेशनसाठी मन्नतला गेलो. इंटरवलच्या वेळी त्यांनी अक्षरशः प्रश्नांचा पाऊस पाडला! मी विचार करत होतो, इतके प्रश्न का विचारत आहेत? तेव्हाच त्यांनी माझ्या मनातलं वाचलं आणि म्हणाले, ‘मी ही फिल्म करतोय, तर सारे प्रश्न विचारून घेऊया.’ मी त्यांना सांगितलं की, माझ्या चित्रपटात एक डायलॉग आहे जो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी फिट बसेल. लगेच तो हसत म्हणाला, ‘बनिये का दिमाग, मियाँ भाई की डेयरिंग!’”
“तो दिग्दर्शकाला बिघडवतो!” राहुल ढोलकिया
रईसच्या अनुभवाबद्दल राहुल म्हणाले, “शाहरुखसोबत काम करणं म्हणजे एक आनंददायी प्रवास होता. तो इतका हुशार, उत्सुक आणि समर्पित आहे की दिग्दर्शकाला बिघडवतो! तो नेहमी तयारीनिशी येतो आणि प्रत्येक सीनमध्ये एक्सपेरिमेंट करायला तयार असतो. त्याच्यासोबत काम करणं म्हणजे एक कोलॅबोरेटिव्ह एक्सपीरियन्सअसतो. तो चर्चेत पूर्णपणे गुंततो, जगभरात काय घडतंय याची माहिती ठेवतो, विशेषतः दारूबंदी कायदे किंवा त्यासारख्या सामाजिक मुद्द्यांवर त्याला सखोल माहिती असते. त्याने खूप वाचन केलं आहे, त्यामुळे संवाद अधिक समृद्ध होतो.”
“तो प्रत्येक क्षणी उपस्थित असतो”
राहुल म्हणतात, “पहिल्या भेटीतून शेवटच्या भेटीपर्यंत शाहरुख एकदाही डिस्टॅ्रक्ट झाला नाही. ना फोन कॉल, ना मेसेज. तो समोरच्या व्यक्तीला महत्व देतो, त्याच्या वेळेचा आदर करतो. स्क्रिप्ट चर्चेदरम्यान तो स्वतः नोट्स लिहितो, अगदी एखाद्या अभ्यासू विद्यार्थ्यासारखा. आणि सगळ्यात खास म्हणजे, तो तुम्हाला स्वतः गेटपर्यंत सोडायला येतो. वेळ काहीही असो.”
दोन वर्षांचा लांब प्रवास
दिग्दर्शक पुढे सांगतात, “त्याच्याकडे आधी ‘चेन्नई एक्सप्रेस’ आणि ‘हॅप्पी न्यू इयर’ पूर्ण करायच्या होत्या, त्यामुळे ‘रईस’च्या शूटसाठी मला दोन वर्षं थांबावं लागलं. आम्ही 2013 मध्ये भेटलो होतो, पण शूटिंग 2015 मध्ये सुरू झालं. पहिल्या शेड्यूलनंतर सात महिन्यांचा गॅपही होता. मात्र प्रत्येक क्षणाचं सोनं झालं.”
“मी मटणच खाईन!” शाहरुखचा हट्ट
‘रईस’मध्ये शाहरुखनं गुजरातमधल्या एका स्मगलर आणि गँगस्टरची भूमिका साकारली होती. राहुल ढोलकिया म्हणाले, “प्रत्येक सीनमध्ये त्यानं मला आश्चर्यचकित केलं. एका सीनमध्ये तो जीशान अय्यूबसोबत ढाब्यावर बसून जेवत होता. त्या सीनमध्ये त्याला मटण खायचं होतं. मात्र, आम्हाला सांगितलं गेलं होतं की शाहरुख मटण खात नाही आणि त्याचं जेवण ओबेरॉय हॉटेलमधून येईल तेही फॅन्सी चिकन! पण सीन तेव्हाच परिपूर्ण झाला, जेव्हा त्यानं खरं मटण तसंच खाल्लं जसं ‘मियाँ भाई’ खाऊन दाखवतात.” राहुल पुढे म्हणाले, “मी त्याला सांगितलं की या सीनसाठी तुला मटण खायलाच पाहिजे. तो म्हणाला, ‘मी मटणच खाईन ना, काही हरकत नाही, पण हे आपल्या दोघांतच राहू दे. टीमला सांगू नकोस.’ त्यानंतर त्यानं तो मटणचा तुकडा अगदी नैसर्गिक पद्धतीनं खाल्ला ',हाड्या चोखत, थपथपत' जसा एखादा ‘मियाँ भाई’ खाण्याचा आनंद घेतो. तो सीन इतका खरा वाटला की सगळ्यांनाच तो आवडला. हाच त्या सीनची आणि त्याच्या अभिनयाची खरी जादू होती.”


















