Jawan Advance Booking : शाहरुख खानच्या 'जवान'च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात; रिलीजआधीच मोडला 'पठाण'चा रेकॉर्ड
Jawan Movie : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे.
Shah Rukh Khan Jawan Movie Advance Booking : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या 'जवान' (Jawan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. कोरोनानंतर किंग खानचा 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. आता अभिनेत्याच्या 'जवान' या सिनेमाकडूनही प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. शाहरुखच्या 'जवान' या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे.
शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आता परदेशात या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. यूएईमध्ये या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात होणार आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये रिलीजआधीच या सिनेमाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या 'पठाण' (Pathaan) या सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) 'जवान' या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. सिनेमा रिलीज होण्याला अद्याप तीन महिने बाकी आहेत. आता सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगचे आकडे समोर आले असून ते खूपच सकारात्मक आहेत. वेंकी रिव्यूज आणि सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'जवान' या सिनेमाच्या रिलीजच्या तीन आठवडे आधी या सिनेमाचे 4,800 तिकीटांची विक्री झाली आहे.
'जवान'चं ओपनिंग डे कलेक्शन किती असेल? (Jawan Opening Day Collection)
'पठाण' या सिनेमाने अमेरिकेत रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.85 मिलियन डॉलरची कमाई केली होती. तर आता 'जवान' हा सिनेमा 'पठाण' सिनेमापेक्षा जास्त कमाई करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, परदेशात 'पठाण'ने 37 कोटींचं ओपनिंग डे कलेक्शन केलं होतं. तर 'जवान' (Jawan) हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी परदेशात 50 कोटींचा गल्ला जमवू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
शाहरुख खानचा 'जवान' हा मल्टीस्टारर सिनेमा आहे. या सिनेमात शाहरुखसह नयनतारा आणि सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच या सिनेमात बॉलिवूड मस्तानी दीपिका पदुकोणची (Deepika Padukone) झलक दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. शाहरुख आणि नयनताराचा रोमँटिक अंदाज पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'जवान' या सिनेमाच्या माध्यमातून नयनतारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक एटली कुमार 'जवान' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. 'जवान' हा शाहरुखचा बिग बजेट सिनेमा आहे. 300 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. शाहरुखच्या रेड चिलीज या निर्मिती संस्थेच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमातील चलेया आणि जिंदा बंदा ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. लोकप्रिय संगीतकार अनिरुद्ध रवितंदर यांनी ही गाणी गायली आहेत.
किंग खानच्या 'पठाण' या सिनेमाची निर्मिती 250 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली होती. तर रिलीजनंतर या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली. 2023 मधला सर्वाधिक कमाई करणारा 'पठाण' हा सिनेमा ठरला. भारतात या सिनेमाने 500 कोटी तर जगभरात 1020 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. आता शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या