Salman Khan Rashmika Mandanna : बॉक्स ऑफिसवर सलमानला भारी पडलीय रश्मिका, पाहा दोन्ही कलाकारांच्या चित्रपटांची कमाई
Salman Khan Rashmika Mandanna : 2025 मध्ये ईदच्या दिवशी सलमान खानचा सिंकदर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत नॅशनल क्रश रश्मिका मंदानादेखील झळकणार आहे.
Salman Khan Rashmika Mandanna : यंदाच्या वर्षी रमझान ईदच्या मुहूर्तावर बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानचा (Salman Khan) एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. या वर्षीदेखील त्याचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही. मागील जवळपास दीड दशक ईदच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या सलमानच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आता पुढील वर्षी 2025 मध्ये ईदच्या दिवशी सलमान खानचा सिंकदर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत नॅशनल क्रश रश्मिका मंदानादेखील (Rashmika Mandanna) झळकणार आहे. सलमानचा हा चित्रपट 2025 मधील सर्वात हिट चित्रपट ठरू शकतो.
'हॉलिडे' आणि 'गजनी' सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे ए.आर. मुरुगदास हे सलमानच्या सिंकदर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांची ही रुपेरी पडद्यावरील नवी जोडी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करू शकते असा अंदाज आताच बांधला जात आहे. दोन्ही कलाकारांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणावर कमाई केली आहे. 2023 च्या बॉक्स ऑफिस रेकॉर्डवर नजर टाकली तर रश्मिकाने सलमानला मागे टाकले आहे.
बॉक्स ऑफिसवर सलमानपेक्षा रश्मिकाची हवा!
2023 हे वर्ष मोठ्या हिटचे वर्ष होते. यावर्षी शाहरुखच्या जवान, पठाण आणि डंकी या चित्रपटाने मिळून 2500 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर सनी देओलच्या 'गदर 2' ने बॉक्स ऑफिसवर धमाल केली होती. या वर्षी 'ॲनिमल' हा आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातून रणबीर कपूरने पुन्हा एकदा आपलं नाणं खणखणीत वाजवलं. तर बॉबी देओलच्या सिने करिअरला पु्न्हा बु्स्ट मिळाला. या चित्रपटामुळे तृप्ती डिमरी ही एका रात्रीत नॅशनल क्रश झाली.
तर रश्मिकाचे 2021 चा 'पुष्पा - द राइज' आणि 2023 चा 'ॲनिमल' असे दोन ब्लॉकबस्टर चित्रपट होते. Sacknilk नुसार, रश्मिकाच्या 'पुष्पा - द राइज'ने जगभरात 350 कोटींहून अधिक कमाई केली. तर 'ॲनिमल'ने जगभरात 915 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सलमान खानला कुठे फटका बसला?
रश्मिकाने 2021 ते 2023 या काळात दोन ब्लॉकबस्टर चित्रपट दिले, तर सलमान खानचे 'राधे', 'अंतिम', 'किसी का भाई किसी की जान' आणि 'टायगर 3' हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. 'टायगर 3' वगळता यापैकी एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करू शकला नाही. 'टायगर 3'हिट झाला तरी त्याच्याकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही.
सलमानच्या या चित्रपटाकडून जवान, पठाण सारखी कमाई अपेक्षित होती. मात्र या चित्रपटाने जगभरात केवळ 464 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचा केवळ हिट श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. तर याच चित्रपटाचा भाग असलेल्या 'टायगर जिंदा है' ने अवघ्या 7 वर्षांपूर्वी 558 कोटींची कमाई केली होती.
सलमानच्या नावावर मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा नाही
रश्मिकाच्या नावावर दोन मोठे ब्लॉकबस्टर आहेत. तर सलमान खानने गेल्या 7-8 वर्षात एकही ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेला नाही. एक तर त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सरासरी किंवा फ्लॉप ठरले आहेत.या ठिकाणीही रश्मिका सरस ठरत आहे.
2025 मध्ये बॉक्स ऑफिसवर धमाका करणार?
सलमानकडे सध्या तरी कोणताही मोठा हिट चित्रपट नाही. पण 2009 पासूनच्या त्याच्या हिट चित्रपटांची सरासरी पाहिल्यास, तो इतर कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्यापेक्षा सरसच आहे. आजही लोक त्याला पाहण्यासाठी पडद्यावर जातात. सलमान खानचा एखादा चित्रपट हा 100 ते 150 कोटींचा टप्पा सहज पार करतो.