(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रेकी करुन सलमान खानच्या हत्येचा कट, पोलिसांकडून शार्पशूटरला बेड्या
अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला. फरीदाबाद पोलिसांनी कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या शार्पशूटरला अटक केली आहे.
फरीदाबाद : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. शार्प शूटर असलेल्या आरोपीने सलमानची माहिती गोळा करण्यासाठी रेकी केली होती. सलमान खान कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे. ही टोळी पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधून संचालित होते.
सूत्रांच्या माहितीनुसार फरीदाबाद पोलिसांनी भिवानी जिल्ह्यातील असलेल्या 27 वर्षीय राहुल संगा उर्फ बाबाला अटक केली. सध्या तो उत्तराखंडच्या हिस्सारमध्ये राहत होता. अनेक गुन्ह्यांमध्ये तो सहभागी होता. त्याला चौकशीसाठी फरीदाबाद इथे आणण्यात आलं होतं. कारण एका स्थानिकाच्या हत्येप्रकरणी पोलीस त्याच्या मागावर होते. त्याच्याकडून एक रिव्हॉल्वरवर जप्त करण्यात आलं आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, राहुल यावर्षी जानेवारी महिन्यात मुंबईच्या वांद्र्यात गेला होता, जिथे सलमान खानचं घर आहे. राजस्थानच्या जेलमध्ये असेलल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या निर्देशआनुसार राहुलनेसलमान खानची आणि हालचालांची तीन दिवस रेकी केली होती.
काळवीट शिकारी प्रकरणात सुटका झालेला सलमान खान लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर होता. यासाठी त्याने मागील वर्षी एका गँगस्टरलाही सलमानच्या मागावर पाठवलं होतं.
पोलिसांनी शार्प शूटर राहुलची इतर प्रकरणांमध्ये मदत केल्याच्या आरोपात इतर जार जणांनाही अटक केली आहे. मनीष, रोहित, आशीष आणि भारत अशी अटक केलेल्यांची नावं आहे. राहुल, भरत आणि आशिषला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, तर इतर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
याआधी जून महिन्यात हरियाणा पोलिसांनी शार्पशूटर संपत नेहराला हैदराबादमधून अटक केली होती. सलमान खानच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी तो मुंबईला गेला होता.