(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sacheen Littlefeather: 'ऑस्कर'ला नमतं घ्यायला लावणाऱ्या अभिनेत्री सचिन लिटिलफेदर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सचिन लिटिलफेदर (Sacheen Littlefeather) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Sacheen Littlefeather: अभिनेत्री आणि मूळ अमेरिकन नागरी हक्क कार्यकर्त्या सचिन लिटिलफेदर (Sacheen Littlefeather) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, सचिन लिटिलफेदर या काही दिवसांपासून स्तनाच्या कर्करोगाचा सामना करत होत्या. 50 वर्षांपूर्वी सचिन लिटिलफेदर यांनी ऑस्कर स्विकारण्यास नकार दिला होता. या पन्नास वर्षापूर्वीच्या प्रकरणाबद्दल काही दिवसांपूर्वी अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने म्हणजेच ऑस्करनं सचिन लिटिलफेदर यांची माफी देखील मागितली होती.
कोण होत्या सचिन लिटिलफेदर?
सचिन लिटिलफेदर यांचा जन्म 1946 मध्ये कॅलिफोर्निया येथे झाला. त्यांचे वडिल हे अमेरिकेचे होते तर आई ही युरोपियन होती. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव मेरी लुईस क्रूज असं ठेवलं होतं. पण 1970 मध्ये त्यांनी आपले नाव बदलून सचिन लिटलफिदर असे ठेवले. सचिन लिटिलफेदर यांच्या जीवनावर आणि कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेल्या कार्यावरील सचिन ब्रेकिंग द सायलेन्स हा माहितीपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला. सचिन लिटिलफेदर यांनी 1974 मध्ये रिलीज झालेल्या ‘द ट्रायल ऑफ बिली जॅक’ आणि ‘शूट द सन डाउन’ या चित्रपटांमध्ये काम केले.
50 वर्षांनंतर ऑस्करनं मागितली सचिन लिटिलफेदर यांची माफी
45 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये सचिन लिटलफेदर यांनी मार्लन ब्रँडो यांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार नाकारण्यासाठी आणि 1973 मध्ये अमेरिकेने स्थानिक लोकांसोबत केलेल्या गैरवर्तनाबद्दल बोलण्यासाठी स्टेजवर पाऊल ठेवले. तेव्हा त्या 26 वर्षांच्या होत्या. हा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील चर्चेत असणारा प्रसंग होता. 1973 मध्ये मार्लन ब्रँडोच्या वतीने अकादमी अवॉर्ड्स स्वीकारण्यासाठी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर सचिन लिटिलफेदर या आल्या होत्या. मंचावरील त्यांच्या 60 सेकंदांच्या भावूक भाषणानं अनेकांचे लक्ष वेधले. या भाषणामध्ये सचिन लिटिलफेदर यांनी सांगितलं की, 'आज चित्रपटसृष्टीने अमेरिकन भारतीयांना दिलेली वागणूक ही योग्य नाही' अमेरिकन भारतीयांना चांगली वागणूक न दिल्यानं सचिन लिटिलफेदर यांनी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर बहिष्कृत करण्यात आले. गेल्या 50 वर्षांपासून त्याच्याशी भेदभाव करण्यात आला. त्यानंतर पन्नास वर्षांनी ऑस्करनं या प्रसंगाबद्दल माफी देखील मागितली होती.
Sacheen Littlefeather, Native American civil rights activist who famously declined Marlon Brando’s 1973 Best Actor Academy Award, dies at 75. pic.twitter.com/OlpsoItlCw
— The Academy (@TheAcademy) October 3, 2022
अकादमीचे माजी अध्यक्ष डेव्हिड रुबिन यांनी लिटलफेदरला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "तुमच्यासोबत झालेले गैरवर्तन हे अनावश्यक आणि अन्यायकारक आहे. इतके दिवस तुम्ही दाखवलेले धाडस ओळखता आले नाही. यासाठी आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि तुमचे कौतुक करतो."
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: