Ruiank : महाविद्यालयीन नाट्यप्रेमी विद्यार्थ्यांसाठी रंगभूमी म्हणजे एकांकिका स्पर्धा. कोरोना महामारीमुळे एकांकिका स्पर्धा झाल्या नाहीत. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने एकांकिका स्पर्धा होऊ लागल्या आहेत. नुकताच रुईया महाविद्यालयाचा 'रुईयांक' (Ruiank) हा नाट्यमहोत्सव पार पडला. या महोत्सवाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
सांस्कृतिक उपक्रमांसाठी मुंबईतील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय ओळखले जाते. तसेच एकांकिका स्पर्धांमध्येदेखील गेल्या अनेक वर्षांपासून रुईया नाट्यवलयचा दबदबा पाहायला मिळत आहे. नुकताच पार पडलेला 'रुईयांक' नाट्यमहोत्सव निशिकांत कामत (Nishikant Kamat) यांच्या आठवणीत रंगला. या महोत्सवात प्रेक्षकांना नवीन आणि जुन्या एकांकिकांचं एकत्रीकरण पाहायला मिळालं.
निशिकांत कामत यांना समर्पित 'रुईयांक'
निशिकांत कामत हे मनोरंजनसृष्टीतील एक महत्त्वाचे नाव आहे. त्यांनी अनेक नाटकांच्या, सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तसेच रुईया महाविद्यालयासोबतदेखील निशिकांत कामत यांचं नाव जोडलं गेलं आहे. त्यांनी रुईया महाविद्यालयाच्या अनेक एकांकिका दिग्दर्शित केल्या आहेत. त्यामुळे यंदाचा नाट्यमहोत्सव निशिकांत कामत यांना समर्पित होता. निशिकांत कामत यांच्या स्मरणार्थ 'रुईयांक' या नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
'रुईयांक' नाट्यमहोत्सवात 'मंजुळा'ने वेधलं लक्ष
निशिकांत कामत यांच्या स्मरणार्थ 'रुईयांक' या नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सावात निशिकांत कामत लिखित, दिग्दर्शित 'मंजुळा' ही एकांकिकादेखील सादर झाली. अंगावर शहारे आणणाऱ्या 'मंजुळा' एकांकिकाने नाट्यमहोत्सवातील प्रत्येक प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेतलं होतं. 'ईशा डे' या एकांकिकेत मुख्य भूमिकेत होती. त्यावेळी 'मंजुळा' या एकांकिकेने निशिकांत कामत यांना मनोरंजनविश्वात ओळख मिळवून दिली होती.
'अनन्या'चा टीझर लॉंच
'अनन्या' ही रुईया महाविद्यालयाची एकांकिका होती. त्यानंतर या नाटकाचे मराठी, गुजराती नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता 'अनन्या' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'अनन्या' सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप कड यांनी केलं आहे. तर हृता दुर्गुळे या सिनेमात अनन्या हे पात्र साकारत आहे. 'रुईयांक' नाट्यमहोत्सवात 'अनन्या' सिनेमाचा टीझर लॉंच करण्यात आला. हा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
संबंधित बातम्या