Ruiank : मुंबईतील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय (Ruia College) सांस्कृतिक उपक्रमांसाठी ओळखले जाते. एकांकिका स्पर्धांमध्ये रुईया नाट्यवलयचा दबदबा आहे. रुईया नाट्यवलयने मनोरंजन सृष्टीला अनेक अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ दिले आहेत. अनेक एकांकिका स्पर्धा रुईया महाविद्यालयाने गाजवल्या आहेत. कोरोनामुळे एकांकिका स्पर्धा झाल्या नाहीत. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने 'रुईयांक' हा नाट्यमहोत्सव होणार आहे. या महोत्सवाची खासियत म्हणजे हा महोत्सव निशिकांत कामत (Nishikant Kamat) यांच्या आठवणीत रंगणार आहे.
रुईयांक नाट्यमहोत्सव म्हणजे नवीन व जुन्या एकांकिकांचे एकत्रीकरण
रुईया महाविद्यालयाच्या नाट्य विभागातर्फे केला जाणारा रुईयांक नाट्यमहोत्सव हा नवीन व जुन्या एकांकिकांचे एकत्रीकरण आहे. हा महोत्सव प्रेक्षकांसाठी एक दुर्मीळ संधी आणि पर्वणी आहे. आजच्या पिढीला ही जुनी नाटके त्यांच्या मूळ स्वरूपात पाहायला मिळतील आणि त्यांच्या ज्ञानात भर पडेल.
आजच्या पिढीला थिएटर ग्रुप्सशी प्रत्यक्ष संवाद साधता येईल. त्यामुळे दोन वेगळ्या काळातील नाटक संस्कृतीची परस्पर देवाणघेवाण होईल.
रामनारायण रुईया महाविद्यालय आणि रुईया नाट्यवलयतर्फे दोन दिवसांच्या 'रुईयांक' या नाट्यमहोत्सवाचे नियोजन केले आहे. 'रुईयांक'च्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध मराठी नाटकांचे अभिवाचन होणार आहे. तसेच 'आठवणीतले निशि सर' हा टॉक शो होणार आहे. तसेच आधुनिक भारतीय रंगभूमीच्या इतिहासावर नाट्य प्रदर्शनाचेदेखील आजोजन करण्यात आले आहे.
'रुईयांक'चा दुसरा दिवस खास
रुईयांकचा दुसरा दिवस खास असणार आहे. नाट्यमहोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांना 4 नाटकं पाहायला मिळणार आहेत. त्यापैकी दोन गौरवशाली लोकप्रिय पुरस्कार विजेते आणि गेल्या दशकातील एक एकांकिका आहे. दिवंगत निशिकांत कामत लिखित आणि दिग्दर्शित ‘मंजुळा’ आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक आणि दिग्दर्शक प्राजक्त देशमुख लिखित आणि दिग्दर्शित एक नवीन दीर्घांक ‘जाळीयेली लंका’. यासोबतच या वर्षी सादर होणारी दोन नवीन पुरस्कार विजेती एक अंकी नाटके असतील. प्राजक्त देशमुख लिखित ‘बुद्रुकवाडीचा मारुती बाटला’ ही एकांकिका आणि जी.ए. कुलकर्णी लिखित ‘प्रसाद’ ही एकांकिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
निशिकांत कामत यांना समर्पित 'रुईयांक'
निशिकांत कामत हे मनोरंजनसृष्टीतील एक महत्त्वाचे नाव आहे. त्यांनी अनेक नाटकांच्या, सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे यंदाचा नाट्यमहोत्सव निशिकांत कामत यांना समर्पित असणार आहे. अनेक गाजलेल्या सिनेमांचे आणि नाटकांचे दिग्दर्शक असलेल्या निशिकांत कामत यांच्या स्मरणार्थ 'रुईयांक' या नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 'रुईयांक' या नाट्यमहोत्सावाला अनेक कलाकारमंडळी हजेरी लावणार आहेत.
कधी होणार एकांकिका महोत्सव? 17 जून
किती वाजता? दुपारी 4 वाजता
कुठे? रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी
संबंधित बातम्या