Pankaj Udhas : पहिली कमाई 51 रुपयांची, 700 चित्रपटांसाठी पार्श्वगायन; पंकज उधास यांची संपत्ती किती?
Pankaj Udhas : सुप्रसिद्ध गायक पंकज उधास यांचे आज, 26 फेब्रुवारी रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Pankaj Udhas : सुप्रसिद्ध गायक पंकज उधास (Pankaj Udhas) यांचे आज, 26 फेब्रुवारी रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. पंकज यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर सिनेइंडस्ट्री आणि संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मुंबईत मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे.
पंकज उधास यांचा जन्म 15 मे 1951 रोजी जेतपूर, गुजरात येथे केशुभाई उधास आणि जितुबेन उधास यांच्या घरी झाला. तीन भावांमध्ये ते सर्वात लहान होते. त्यांचा मोठा भाऊ मनहर उधास हा देखील बॉलीवूड चित्रपटांमध्ये गझल गायक आहे. त्यांचे दुसरे मोठे भाऊ निर्मल उधास हे देखील प्रसिद्ध गझल गायक आहेत.
वयाच्या 7 व्या वर्षी गाण्यास सुरुवात...
पंकज उधास हे लहानपणापासूनच संगीतात रुची घेऊ लागले होते. वयाच्या 7 व्या वर्षापासूनच त्यांनी गायनास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात पंकज हे फक्त आवड म्हणून गीत गात होते. मात्र, त्यांच्या भावाने पंकज यांच्यातील गायकाला ओळखले आणि गाण्याच्या कार्यक्रमासाठी उत्साह वाढवला आणि आपल्यासोबत गाण्याच्या कार्यक्रमास घेऊन जाण्यास सुरुवात केली.
भावाच्या मदतीने सिने इंडस्ट्रीत पाऊल ठेवले...
भावाच्या मदतीने पंकज उदास हे अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहू लागले. एका कार्यक्रमात त्यांनी भावासोबत गाणे गायले. हा तो काळ होता जेव्हा भारत-चीन युद्ध सुरू होते. ‘ए वतन के लोगों’ हे गाणे गाऊन त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर लहानग्या पंकजला 51 रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. तेव्हापासून त्यांनी गायन आणि गझलच्या दुनियेत आपली कारकीर्द सुरू केली.
View this post on Instagram
या गाण्यांनी झाले प्रसिद्ध...
पंकज उधास त्यांच्या मधुर गझल आणि गाण्यांमुळे खूप प्रसिद्ध झाले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ‘चांदी जैसा रंग है तेरा’ या सुपरहिट गझलने संगीत क्षेत्रात आपली छाप सोडली. अनेक अल्बम आणि गाण्यांमुळे त्यांनी अनेक वर्षे इंडस्ट्रीवर राज्य केले. 'नाम' या चित्रपटातील 'चिट्टी आयी है ' या गाण्याने पंकज उधास यांना मोठी लोकप्रियता लाभली. त्याशिवाय, 'आहिस्ता करिये बातें', 'एक तरफ उसका घर' आणि 'थोडी थोडी पिया करो' यांसारखी त्यांची प्रसिद्ध गाणी आजही लोक गातात.
पंकज उधास यांची संपत्ती किती? (Pankaj Udhas Net Worth)
आजारी होण्याआधी पंकज उधास यांनी अनेक स्टेज शो, लाईव्ह कार्यक्रमात आपसा परफॉर्मन्स सादर केला. पंकज उधास यांचा एक युट्युब चॅनेलदेखील आहे. या चॅनलचे लाखो सब्सक्राइबर आहेत. मीडिया रिपोर्ट्स नुसार, पंकज उधास यांनी आपल्या पश्चात 24-25 कोटी रुपयांची संपत्ती सोडली आहे.