एक्स्प्लोर
REVIEW | नोटबुक - तरल हळूवार प्रेमकथा
तिथे गेल्या वर्षी एक शिक्षिका शिकवत असे. पण तिचं लग्न ठरलं आणि ती दिल्लीला गेली आहे. त्या शाळेत शिक्षक म्हणून जाण्याचं कबीर ठरवतो आणि तिथल्या दुर्गम शाळेत रुजू होतो. मग त्याला तिथे सापडते ती यापूर्वी असलेल्या शिक्षिकेची.. फिरदौसची डायरी. आणि मग एकेक पान वाचत जाताना त्याला आयुष्याचा नवा साक्षात्कार होत जातो.
प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणूस नेमून दिलेलं काम करत असतो. पण तो त्या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर तो मागे काय पाऊलखुणा ठेवून जातो यावर त्या माणसाचं काम, त्याचे विचार.. त्याचे आचार आणि एकूण व्यक्तिमत्व ठरतं. अर्थात ते ठरवता ते त्याच्यानंतर त्या जागी आलेले.. तिथे काम करणारी मंडळी. नोटबुक असाच आहे. एका शिक्षिकेने एका वहीच्या रgपाने ठेवलेले, मांडलेले काही विचार हाताशी धरुन तिथे आलेला शिक्षक मनातल्या बंद खोलीत तिला शोधू लागतो.. तिचं चित्र बनवू लागतो आणि नंतर त्या चित्राच्या प्रेमात पडतो. जगण्याच्या कोलाजाची ही गोष्ट म्हणजे नोटबुक आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. असो
कोणताही सिनेमा जाहीर झाला की त्याचे काही ठोकताळे असतात. त्यावरून साधारणत: चित्रपटाचा प्रेक्षक चित्रपटाबद्दल अंदाज लावत असतो. अगदीच उदाहरण द्यायचं तर नोटबुकचं देता येईल. या सिनेमात नूतनची नात प्रनूतन आहे. हा चित्रपट सलमान खानच्या एसकेएफ बॅनरने तयार केला आहे अशी हवा तयार झाल्यानंतर नोटबुकबद्दल उत्सुकता होती. कारण टीचर्स डायरी या चित्रपटाचा हा अधिकृत रिमेकही आहे. पूर्ण नवे कलाकार घेऊन दिग्दर्शक नितीन कक्कर यांनी हा चित्रपट बनवला आहे. काश्मीरच्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट घडत असल्यामुळे त्याला एक वेगळं महत्व आहे. ही एक तरल प्रेमकथा आहेच. पण त्यापलिकडे यात काश्मिरी लोकांचे प्रश्न आहेत. तिथल्या शिक्षणाची अवस्था सांगण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे हा चित्रपट आणखी काही सांगू लागतो.
ही गोष्ट कबीरची आहे. कबीर सैन्यात होता. पण त्याच्या आयुष्यात एक अशी घटना घडली आहे, ज्याने त्याने सैन्य सोडलं आहे. त्याला त्याच्या काकांनी काश्मीरमध्ये बोलावलं आहे. त्याच्या वडिलांची शाळा गेल्या वर्षभरापासून बंद आहे. तिथे गेल्या वर्षी एक शिक्षिका शिकवत असे. पण तिचं लग्न ठरलं आणि ती दिल्लीला गेली आहे. त्या शाळेत शिक्षक म्हणून जाण्याचं कबीर ठरवतो आणि तिथल्या दुर्गम शाळेत रुजू होतो. मग त्याला तिथे सापडते ती यापूर्वी असलेल्या शिक्षिकेची.. फिरदौसची डायरी. आणि मग एकेक पान वाचत जाताना त्याला आयुष्याचा नवा साक्षात्कार होत जातो. फिरदौसबद्दल कमाल कुतूहल वाटू लागतं. तिच्या लिखाणाच्या, दृष्टीकोनाच्या प्रेमात तो पडतो. पुढे या दोघांची खरंच भेट होते का.. तिच्या लग्नाचं काय होतं.. त्या शाळेत येणाऱ्या मुलांचं काय होतं.. या सगळ्यावर नोटबुक बोलत जातो.
या सिनेमाची गोष्ट अत्यंत तरल आहे. हळूवार अशी. खरंतर या गोष्टीतल्या नायक नायिकांपेक्षा त्यांच्या भवताली असलेल्या इतर व्यक्तिरेखा ही गोष्ट पुढे नेतात. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो शाळेत शिकणाऱ्या मुलांचा. अपेक्षेनुसार हा चित्रपट पसरट न होता खोल होत जातो. जगण्याबद्दल पुन्हा एकदा काही प्रश्न निर्माण करतो. पण म्हणून तो बोजड नाही. तो एक व्यावसायिक चित्रपट आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं.
एकीकडे सैफ अली खान, श्रीदेवी यांच्या मुली एकापेक्षा एक सिनेमातून झळकत असताना मोहनीश बहलच्या मुलीने आणि नूतनच्या नातीने एक खूप तरल प्रेमकथा निवडली आहे. यात तिचं धाडस आहे. तिने या भूमिकेला न्यायही दिला आहे. तिच्यासोबत असलेला झहीर इक्बाल हा नायकही तितकाच निरागस वाटतो. या चित्रपटाची पटकथा पूर्वार्धात काहीशी संथ आहे खरी. पण तो या चित्रपटाचा वेग आहे. कारण हा काही थरारपट किंवा देमारपट नाही. त्यासाठी आवश्यक अशी ती स्पेस आहे असं म्हणायला हरकत नाही. पटकथेला तितक्याच खोल संवादांची जोड आहे. 'आपण एकटे असतो तेव्हा आपल्याला सतत कसलीतरी उणीव भासत असते. काहीतरी अपुरं वाटतं असतं पण अशावेळी खरंतर आपण देवाचे आभार मानायला हवेत. कारण आपण आपल्यासाठी पुरेसे असतो' हा याचा गाभा आहे. मैं खुद के लिये काफी हूं. हे तत्व रुमीच्या तत्वांशी मिळतं जुळतं आहे. प्रत्येकात अवकाश सामावलं आहे असं तो सांगतोच. अशा आशयाच्या संवादांमुळे चित्रपट खोल होत जातो. याशिवाय छायांकन, संकलन, संगीत आदी बाबींमुळे चित्रपट खिळवून ठेवतो. यानिमित्ताने पुन्हा एकदा काश्मिरी सौंदर्य पाहण्याची संधी आली आहे.
ही एक गोड गोष्ट आहे. याचा शेवटही तितकाच गोड आहे. पिक्चर बिक्चरमध्ये या चित्रपटाला मिळत आहेत तीन स्टार्स. प्रामाणिक प्रयत्न आहे. आजच्या भडक जगण्यात काहीतरी तरल देण्याचा प्रयत्न आहे. पाहायला हरकत नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement