Chandu Champion : चंदू चॅम्पियन आणि सुशांत सिंह राजपूतचं खास कनेक्शन, मुर्लिकांत पेटकरांना भेटला होता तेव्हा काय झालं होतं?
Chandu Champion : चंदू चॅम्पियन मुर्लिकांत पेटकर यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा अनुभव सांगितला.
Chandu Champion : रियल स्टोरीवर आधारित 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. चित्रपटातील सत्यकथा संकटांमुळं खचलेल्या अनेकांना प्रेरणा देतीये. 'चंदू चॅम्पियन'ची मुख्य भूमिका कार्तिक आर्यनने (Kartik Aryan) साकारली आहे. मात्र याचे रियल हिरो आहेत, पद्मश्री मूर्लिकांत पेटकर. सांगली जिल्ह्यात 1944 साली जन्मलेले मूर्लिकांत पेटकर यांचा चंदू चॅम्पियन पर्यंतचा प्रवास या चित्रपटात मांडण्यात आलाय. सुरुवातीला दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) त्यांची भेट घेऊन त्यांच्यावर सिनेमा करण्याची इच्छा व्यक्त केली. पण सुशांतने या जगाचा निरोप घेतल्यामुळे त्याची इच्छा अर्धवटच राहिली, हा अनुभव देखील त्यांनी एबीपी माझाला सांगितला.
पेटकरांचं खेळावर असणारं निस्सीम प्रेम, या प्रेमासाठी लष्करात भरती होत मिळविलेली पदं, पाकिस्तान सोबतच्या 1965 सालच्या युद्धात नऊ गोळ्या झेलणारे, दोन वर्षानंतर कोम्यातून बाहेर पडलेले अन् यातून न खचता पॅरोलिम्पिकमध्ये भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळवून देणारे हेच ते रियल चंदू चॅम्पियन आहेत. चंदू चॅम्पियन चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यांच्या या प्रवासावर एबीपी माझाने त्यांना बोलतं केलं.
सुशांत सिंह मला भेटायला आला होता - मुर्लिकांत पेटकर
मी जेव्हा सुवर्णपदक जिंकून आलो, त्यावेळी सुशांत सिंह राजपूत मला भेटायला आला. त्याने माझ्या प्रवासावर सिनेमा करण्याची इच्छा व्यक्त केली. या सिनेमाचं थोडं चित्रीकरणही झालं होतं. पण त्याचवेळी त्याने आत्महत्या केली. त्यानंतर मला वाटलं की आता हा सिनेमा अर्धवटच राहणार. पण एक दिवस चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान माझ्याकडे आले आणि त्यांनी माझी गोष्ट ऐकली. त्यानंतर त्यांनी तो सिनेमा करण्याचा निर्णय घेतला. पण सुशांतसाठी हा सिनेमा 14 जून रोजी प्रदर्शित करण्यात आला, कारण त्याचा मृत्यू 14 जून रोजी झाला होता.
पेटकरांनी सांगितला 'तो' प्रसंग
पेटकरांना युद्धादरम्यान गोळी लागली असता दोन वर्षांनी कोम्यातून बाहेर पडले, हा प्रसंग सांगताना लष्करातील अधिकाऱ्यांसोबत त्यांनी काय केलं, हे प्रत्यक्षात एबीपी माझाच्या प्रतिनिधी दाखवलं. त्यावर त्यांनी म्हटलं की, तेव्हा माझ्या अंगावरुन टँकर गेला होता.त्यानंतर मिलेट्री हॉस्पिटलमध्ये मी होतो. इन्सपेक्शनसाठी साहेब आले. त्यामुळे त्यांची सगळी गडबड सुरु होती. बेडशिट साफ करा वैगरे, माझ्या बेडच्या इथे आले तेव्हा त्यांनी ती चादर ओढली आणि मी खाली पडलो. त्यानंतर माझ्या डोक्याला वैगरे पण मार लागला.मला तेव्हा काही कळतं नव्हतं. मला पुन्हा शुद्ध आली तेव्हा मला असं वाटलं की मी पाकिस्तानातच आहे. ते इन्सपेक्शनसाठी आलेली लोकं पाकिस्तानातले असल्याचं वाटलं. त्यामुळे ते ऑफिसर जेव्हा माझ्याजवळ आले तेव्हा मी त्यांची कॉलर धरली. त्यानंतर त्यांचे असिस्टंटही मला मरायला लागले, की कमांडरला सोडा म्हणून.
पुढे त्यांनी म्हटलं की, मी त्यांना म्हटलं की, तुमचं आयडी दाखवा. त्यापैकी कुणाकडेच त्यांचं आयडी नव्हता. त्यानंतर तिथे नर्स देखील आली. मी तिलाही विचारलं की मी नक्की कुठे आहे ते सांगा. तिने मला सांगितलं की तुम्ही भारतातच आहात, तेव्हा मी शांत झालो.