Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसला 'मुंज्या'ने झपाटलं; सहा दिवसात केली दमदार कमाई...
Munjya Box Office Collection : रिलीजच्या पहिल्या दिवसानंतर चित्रपटाला वीकडेजला ही प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या रिलीजला एक आठवडा पूर्ण होण्याआधीच 'मुंज्या'ने आपलं बजेट वसूल केले आहे.
Munjya Box Office Collection Day 6 : हॉरर कॉमेडीपट असलेल्या मुंज्याने (Munjya) बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसानंतर चित्रपटाला वीकडेजला ही प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या रिलीजला एक आठवडा पूर्ण होण्याआधीच 'मुंज्या'ने आपलं बजेट वसूल केले आहे. मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदारच्या चित्रपटाने बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिसला थक्क केले आहे.
'मुंज्या'ने किती कमावले?
मुंज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चांगले कथानक, कलाकारांचा दमदार अभिनय असला तर मोठी स्टारकास्ट नसली तरी चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करू शकतो हे 'मुंज्या'ने दाखवून दिले आहे. 'मुंज्या'ने राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा रोमँटिक स्पोर्ट्स ड्रामा असलेल्या 'मिस्टर अॅण्ड मिसेस माही'ला मात दिली. मुंज्याने फार प्रमोशन न करताही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
View this post on Instagram
मुंज्याने 4 कोटींच्या कमाईपासून सुरुवात केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 7.5 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी 'मुंज्या'ने 8 कोटी तर चौथ्या दिवशी 4 कोटी रुपये कमवले. पाचव्या दिवशी 'मुंज्या'ची कमाई 4.15 कोटी रुपये होती. चित्रपटाच्या रिलीजच्या सहाव्या दिवशी अर्थात बुधवारी बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. 'सॅकनिल्क'च्या ट्रेंड रिपोर्टनुसार, मुंज्याने रिलीजच्या सहाव्या दिवशी 3.75 कोटींची कमाई केली आहे. त्यानंतर आता मुंज्याचे सहाव्या दिवसापर्यंतचे कलेक्शन आता 31.15 कोटी रुपये झाले आहे.
मुंज्याने सहाव्या दिवशी वसूल केले बजेट
मुंज्याने यशाने बॉलिवूडमधील अनेकांना सुखद धक्का बसला आहे. फक्त 30 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या मुंज्याने रिलीजच्या सहाव्या दिवशीच निर्मितीचा खर्च वसूल केला आहे. हा चित्रपट किमान 35 ते 40 कोटींपर्यंत कमाई करू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या शुक्रवारी कार्तिक आर्यनचा चित्रपट 'चंदू चॅम्पियन' रिलीज होणार आहे. आता हा चित्रपट 'चंदू चॅम्पियन'समोर किती तग धरणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
'भेडिया' युनिव्हर्सचा हिस्सा...
या चित्रपटाच्या पोस्ट क्रेडिट सीन्समध्ये वरुण धवन आणि अभिषेक बॅनर्जी दिसले आहेत. त्यामुळे या चित्रपटाची कथा आता इतर चित्रपटाच्या कथेशी कनेक्ट असू शकते. त्यामुळे आता भेडिया अथवा 'मुंज्या' चित्रपटाचा पुढे कोणता भाग आला तर तो चित्रपट समजण्यास अडचण येऊ नये यासाठी देखील अनेकजण 'मुंज्या' पाहण्यास जात आहे. ''मुंज्या'' हा 'भेडिया' युनिव्हर्सचा एक भाग असल्याच्या चर्चेचा फायदा मिळत आहे.
इतर संबंधित बातम्या :