#MeToo : मेघना गुलजार, जोया अख्तरसह 11 दिग्दर्शकांचा मोठा निर्णय
लैंगिक अत्याचाराचे आरोप सिद्ध झालेल्या कोणत्याही व्यक्तीसोबत (कलाकार) काम करणार नसल्याचं या दिग्दर्शकांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबई : मीटू मोहिमेनंतर बॉलिवडूमधील मेघना गुलजार आणि जोया अख्तर यांच्यासह 11 दिग्दर्शकांनी मोठा निर्णय घेतला आहे. लैंगिक अत्याचाराचे आरोप सिद्ध झालेल्या कोणत्याही व्यक्तीसोबत (कलाकार) काम करणार नसल्याचं या दिग्दर्शकांनी स्पष्ट केलं आहे.
मीटू मोहिमेनंतर बॉलिवूडमधील अनेक महिलांनी उघडपणे आपल्यावर झालेल्या अत्याचाराला सार्वजनिकरित्या वाचा फोडली. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समोर आली. तसेच या बड्या व्यक्तींविरोधात कारवाईही केली जात आहे. त्यांनंतर या 11 दिग्दर्शकांनी हे मोठं पाऊल उचललं आहे.
या 11 दिग्दर्शकांनी एक पत्रक सोशल मीडियावर जारी केलं आहे. यामध्ये या सर्व दिग्दर्शकांची नावं आहेत. तसेच इंडस्ट्रीमधील अशा कोणत्याच व्यक्तीसोबत काम नाही करणार, ज्यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप सिद्ध झाले आहेत, असंही या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.
अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने हे पत्रक आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलं आहे. या पत्रकात रुची नारायण, सोनाली बोस, नंदिता दास, नित्या मेहरा, रीमा कगटी, किरण राव, कोंकणा सेन शर्मा, मेघना गुलजार, अलंकृता श्रीवास्तव, गोरी शिंदे आणि जोया अख्तर यांची नावं आहेत. तसेय या सर्वांनी मीटू मोहिमेला पाठिंबा दिल्याचंही पत्रकामध्ये नमूद केलं आहे.
#metooindia pic.twitter.com/19a6Duj6IR
— Konkona Sensharma (@konkonas) October 14, 2018
आम्ही सर्व महिलांसोबत आहोत. ज्या महिलांनी समोर येऊन आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडली, त्यांचा आम्ही सन्मान करतो आणि त्यांच्या हिमतीला दाद देतो, असं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.