Circuitt : आयपीएलच्या प्लॅटफॉर्मवर प्रमोशन करणारा 'सर्किट' हा पहिलाच मराठी सिनेमा; वैभव तत्त्ववादीनं केली लाईव्ह मॅचची कॉमेंट्री
Circuitt : आयपीएलच्या प्लॅटफॉर्मवर प्रमोशन करणारा "सर्किट" हा पहिलाच मराठी सिनेमा ठरला आहे.
Circuitt Marathi Movie : आयपीएलचा (IPL 2023) फिवर सुरू झाला आहे. तर दुसरीकडे 'सर्किट' (Circuitt) या सिनेमाची जोरदार हवा आहे. आयपीएल आणि टीम 'सर्किट' एकत्र आले ते प्री मॅच सेशनमध्ये. या निमित्तानं पहिल्यांदाच मराठी चित्रपटाचं आयपीएलमध्ये प्रमोशन झालं हे विशेष.
'सर्किट' या सिनेमातील अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे यांनी राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या मॅचपूर्वी माजी क्रिकेटपटू किरण मोरे आणि पूर्वी भावे यांच्याशी क्रिकेट आणि 'सर्किट' या सिनेमासंदर्भात संवाद साधला. या गप्पांतून किरण मोरे यांनी वैभव, हृता आणि माझ्यात एक साम्य असल्याचं सांगितले. ते साम्य म्हणजे, तिघांचाही वाढदिवस एकाच महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये असतो. सिनेमाविषयी रंगलेल्या गप्पांसह 'सर्किट'चा ट्रेलरही दाखवण्यात आला.
वैभव तत्त्ववादीनं केली लाईव्ह मॅचची कॉमेंट्री
वैभव तत्त्ववादीनं लाईव्ह मॅचसाठी कॉमेंट्रीही केली. 'आयपीएल'च्या (IPL) प्लॅटफॉर्मवरील अनुभवाविषयी वैभव आणि हृता म्हणाले की, सुरुवातीला खरंच थोडे दडपण होते, पण हा अनुभव खरंच कमालीचा आणि सदैव लक्षात राहील असा होता.
'सर्किट' कधी होणार रिलीज? (Circuitt Release Date)
'सर्किट' या सिनेमाच्या माध्यमातून मधुर भांडारकर मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. आकाश पेंढारकर दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती मधुर भांडारकर यांनी केली आहे. वैभव तत्त्वादी आणि हृता दुर्गुळे ही फ्रेश जोडी या सिनेमात झळकणार आहे. येत्या 7 एप्रिलला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
वैभव तत्ववादी आणि हृता दुर्गुळे या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र काम केले असले तरी या दोघांनीही टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये उत्तम काम करून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अभिनेता रमेश परदेशी याचीदेखील या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पहायला मिळणार आहे. रोमान्स आणि अॅक्शनचा मिलाफ 'सर्किट' या सिनेमात झाल्याचं टीजरमध्ये पाहता येतं. त्यामुळेच सिनेमाच्या कथेविषयी आणि सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. सिनेमाची पटकथा आणि संवाद संजय जामखंडीने लिहिले आहेत.
संबंधित बातम्या