(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jiah Khan: अक्षय कुमार, बिग बींसारख्या सुपरस्टार्ससोबत केलं काम; वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी संपवलं आयुष्य; कोण होती जिया खान? जाणून घ्या...
जिया खाननं (Jiah Khan) अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं होतं. तिनं अक्षय कुमार, बिग बींसारख्या सुपरस्टार्ससोबत स्क्रिन शेअर केली होती.
Jiah Khan: अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) हिच्या आत्महत्या प्रकरणी आज विशेष सीबीआय कोर्ट आपला निकाल जाहीर करणार आहे. जिया खान हिने 10 वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. जिया खानच्या आत्महत्येनंतर जियाच्या (Jiah khan) आईनं अभिनेता सूरज पांचोलीवर (Sooraj Pancholi) गंभीर आरोप केले होते. या प्रकरणावर आता स्पेशल सीबीआय कोर्ट हे अंतिम निकाल देणार आहे. आता जिया खानच्या मृत्यूप्रकरणावर स्पेशल सीबीआय कोर्ट काय निकाल देईल? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. त्यापूर्वी जिया खान कोण होती? तिनं कोणत्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं? याबाबत जाणून घेऊयात...
20 फेब्रुवारी 1988 रोजी न्यूयॉर्क शहरात जियाचा जन्म झाला. जियाने मॅनहॅटनमधील ली स्ट्रासबर्ग थिएटर आणि फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतले. तिला चित्रपटांच्या ऑफर्स मिळत होत्या, त्यामुळे तिने शिक्षण सोडले. जियानं बेली डान्सिंग, कथ्थक, जॅझ, सांबा यासह विविध नृत्य प्रकार शिकले होते.
वयाच्या 18 व्या वर्षी अभिनयक्षेत्रात केलं पदार्पण
चित्रपटसृष्टीमध्ये करिअर करण्यासाठी जिया ही मुंबईमध्ये आली. जियानं वयाच्या 18 व्या वर्षी राम गोपाल वर्मा यांच्या 'निशब्द' या चित्रपटामधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट 2007 मध्ये रिलीज झाला. ज्यासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. या चित्रपटात तिनं अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली.
2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या गजनी या चित्रपटात जियानं काम केलं. त्यानंतर 2010 मध्ये रिलीज झालेल्या हाऊसफुल या रोमँटिक आणि कॉमेडी चित्रपटात तिनं प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटात तिनं अक्षय कुमार, रितेश देशमुख, दीपिका पादुकोण या कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केली.
3 जून 2013 रोजी जिया खानने मुंबईतील जुहू येथील तिच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली. जियाच्या मृत्यूनं मनोरंजनसृष्टी हादरली होती. आत्महत्येपूर्वी जिया खानने सहा पानी पत्र लिहिले होते, ज्यात तिने सूरज पांचोलीवर गंभीर आरोप केले होते. या पत्रात तिनं सूरज पांचोलीवर गर्भपात आणि मारहाणीचा आरोप केला होता. या प्रकरणात सूरज पांचोलीही काही काळ तुरुंगात होता.
जिया खानची आई राबिया खान यांनी देखील सूरजवर काही गंभीर आरोप केले होते. राबिया खान यांनी कोर्टाला जियाची बॉलिवूडमधील एन्ट्री, तिची कारकीर्द, आणि सूरज पांचोलीसोबतचे नाते याबद्दल सांगितले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या: