Miss India 2022 Sini Shetty : कर्नाटकच्या सिनी शेट्टीने (Sini Shetty) 'मिस इंडिया 2022' (Miss India 2022) हा किताब नुकताच पटकावला आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सिनीने 'मिस इंडिया 2022' या स्पर्धेदरम्यानच्या अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. मुलाखतीदरम्यान सिनी म्हणाली की, 'मिस इंडिया 2022' या स्पर्धेसाठी मला प्रियंका चोप्राने प्रोत्साहित केलं आहे.
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सिनी शेट्टी म्हणाली, बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रामुळे मला प्रेरणा मिळाली आहे. प्रियंकाचा मंचावरचा वावर, तिचं व्यक्तिमत्त्व, सतत काहीतरी नविन शिकण्याची गोष्ट, तिची जिद्द, तिचं वर्चस्व अशा प्रियंकाच्या अनेक गोष्टींनी मला प्रोत्साहित केलं आहे. पण दीपिका पदुकोण आणि आलिया भट्टदेखील मला आवडतात. मला बॉलिवूडच्या एखाद्या स्त्रीप्रधान सिनेमात काम करायला आवडेल. 'ये जवानी हैं दीवानी' हा माझा आवडता सिनेमा आहे. तर माझ्या पहिल्या सिनेमाचा हीरो शाहरुख खान असावा अशी माझी इच्छा आहे".
सिनी शेट्टीने 'मिस इंडिया 2022' या स्पर्धेची तयारी कशी केली होती?
सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत सौंदर्याकडे लक्ष दिलं होतं. व्यक्तिमत्त्व सुधारण्याकडे भर दिला होता. प्रत्येक काम जबाबदारीने करण्याकडे सिनीने भर दिला होता. यासगळ्या यशात सिनी काम करत असलेल्या कंपनीचा मोलाचा वाटा आहे. 'मिस इंडिया 2022' या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर सिनीच्या कंपनीने तिला 40 दिवसांची रजा दिली होती. सहकाऱ्यांनीदेखील तिला मदत केली. सगळ्यांच्या सहकाऱ्यामुळे ती तिचं स्वप्न साकार करू शकली. 'मिस इंडिया 2022' या स्पर्धेत विचारलेल्या प्रश्नांची खरी उत्तरं देण्याकडे सिनीचा भर होता. सिनीने वयाच्या चौथ्या वर्षी नृत्य करायला सुरुवात केली होती तर चौदाव्या वर्षापर्यंत तिने अरंगेत्रम केलं. 'मिस इंडिया 2022' या स्पर्धेसाठी तिला नृत्याचादेखील फायदा झाला.
'मिस इंडिया 2022'चा किताब जिकांवा यासाठी सिनी देवाकडे प्रार्थना करत होती. त्यामुळे मंचावर जेव्हा तिच्या नावाची घोषणा झाली तेव्हा तिला कळलंदेखील नाही. आजुबाजुला कजबज सुरू झाली तेव्हा ती भानावर आली. सिनीला एक आनंददायक धक्का बसला होता. तिच्या आई-बाबांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद तिला पाहायला मिळाला.
संबंधित बातम्या