Urmila Matondkar: बोल्ड अन् ब्यूटिफुल उर्मिला मातोंडकरचा 49 वा वाढदिवस; नव्वदचं दशक गाजवणाऱ्या 'रंगीला गर्ल'ची अशी आहे कारकीर्द
Happy Birthday Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर नव्वदचं दशक गाजवलं. त्यावेळी अनेक वादासोबत तिचे नाव जोडलं गेलं.
मुंबई : बॉलिवूडमधील 'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकर आज 49 वर्षाची झाली. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 4 फेब्रुवारी 1974 रोजी जन्म झालेल्या उर्मिलाने नव्वदचं दशक गाजवलं. बोल्ड आणि ब्युटिफूल दिसणाऱ्या उर्मिलानं डान्सच्या माध्यमातून करिअरचं अत्युच्च शिखर गाठलं, त्यावेळी काही वादही तिच्यासोबत जोडले गेले. या सगळ्यातून बाहेर पडत उर्मिला आता राजकारणात सक्रिय आहे.
बालकलाकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात
उर्मिला मातोंडकरने 1977 साली बीआर चोप्रा यांच्या 'कर्म' या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली होती. 1980 नंतर त्यांनी 'कलयुग', 'मासूम', 'बडे घर की बेटी', 'डाकूट' यांसारख्या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं.1991 मध्ये सनी देओलसोबतच्या 'नरसिंहा' चित्रपटात पहिल्यांदा उर्मिलाने मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलं. नंतरच्या काळात तिला 'रंगीला', 'जुदाई', 'खूबसूरत', 'प्यार तूने क्या किया', 'पिंजर' यांसारख्या चित्रपटांमधून वेगळी ओळख मिळाली. तिच्या अभिनयाव्यतिरिक्त, ती तिच्या हॉट आणि सिझलिंग डान्स मूव्हसाठी देखील ओळखली जायची.
रंगीला चित्रपटातील तिच्या डान्सचं चांगलंच कौतुक करण्यात आलं होतं. या चित्रपटातील 'तन्हा-तन्हा यहाँ पे जिना' हे गाणं सुपरहिट ठरलं. हे गाणे आशा भोसले यांनी गायलं असून संगीत ए आर रहमान यांनी दिले आहे.
उर्मिलाच्या 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चायना गेट' चित्रपटातील 'छम्मा छम्मा' या गाण्यातील डान्सच्या माध्यमातून एक वेगळीच छाप उमटवली. अलका याज्ञिक, शंकर महादेवन आणि विनोद राठोड यांनी गायलेले हे गाणे 1998 मध्ये खूप हिट ठरले. 'लज्जा' चित्रपटातील गाण्यांतून उर्मिलाने तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली. दुसरीकडे, उर्मिला मातोंडकरने 'पिंजर' चित्रपटात हिंदू-पंजाबी मुलीची भूमिका साकारल्याबद्दल खूप प्रशंसा झाली. देशाच्या फाळणीवर आधारित या चित्रपटातील उर्मिलाच्या अभिनयाने तिला रातोरात स्टार बनवलं. 'जुदाई' चित्रपटात पतीला विकत घेण्यासाठी दोन कोटी देणाऱ्या तरुणीची तिने भूमिका साकारली.
त्यावेळी बोल्ड आणि ग्लॅमरस दिसणाऱ्या उर्मिलाचं नाव अनेक वादांमध्ये अडकलं. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा याच्यासोबत तिच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या. 'रंगीला' हिट झाल्यानंतर उर्मिला मातोंडकरने राम गोपाल वर्मासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. राम गोपाल वर्मा यांच्यासोबतचे तिचे बहुतेक चित्रपट हिट ठरले. नंतरच्या काळात उर्मिला हळूहळू बॉलिवूडपासून दूर गेली.
उर्मिलाने तिच्यापेक्षा 9 वर्षांनी लहान असलेल्या काश्मिरी व्यापारी मोहसिन अख्तरसोबत लग्न केले. उर्मिलाच्या लग्नात फक्त दोन्ही कुटुंबे आणि त्यांचे जवळचे मित्र उपस्थित होते. मोहसीन हा बिझनेसमन असण्यासोबतच मॉडेल देखील आहे. 'लक बाय चान्स' या चित्रपटातही तो दिसला आहे.
राजकारणात एन्ट्री
बॉलिवूडच्या यशानंतर उर्मिलाने राजकारणात एन्ट्री केली. 2019 साली उर्मिलाने काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर लोकसभा निवडणूक लढवली, पण त्यामध्ये तिला अपयश आलं. सध्या शिवसेनेत असलेल्या उर्मिलाचे नाव एकेकाळी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत होतं. पण त्या यादीवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने उर्मिला मातोंडकर आमदार होता-होता राहिली. आजही वयाच्या 49 व्या वर्षी उर्मिला फिट दिसते. उर्मिला तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते.