Happy Birthday Shakti Kapoor : एका गाडीला धडक दिली अन् शक्ती कपूर यांचं नशीबच पालटलं! वाचा अभिनेत्याबद्दल...
Shakti Kapoor Birthday : बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर (Shakti Kapoor) आज त्यांचा 70वा वाढदिवस साजरा करत आहेत
Shakti Kapoor Birthday : अभिनेते शक्ती कपूर (Shakti Kapoor) यांनी बॉलिवूडमध्ये अनेक नकारात्मक भूमिका करून स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी केवळ नकारात्मक भूमिकांनीच नाही, तर आपल्या कॉमेडी भूमिकांमधूनही प्रेक्षकांना खूप हसवले आहे. आज (3 सप्टेंबर) शक्ती कपूर यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 03 सप्टेंबर 1952 रोजी दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला. शक्ती कपूर आज त्यांचा 70वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांनी साकारलेला खलनायक इतका जिवंत वाटायचा की, पडद्यावर त्यांची एन्ट्री होताच प्रेक्षक त्यांच्याकडे द्वेषाने पाहू लागायचे.
शक्ती कपूर (Shakti Kapoor) यांचे खरे नाव सुनील सिकंदरलाल कपूर असे होते. शक्ती कपूर यांचे वडील सिकंदर लाल कपूर यांचे दिल्लीत टेलरचे दुकान होते आणि त्यांच्या आई सुशीला घर सांभाळायच्या. बालपणी शक्ती यांना अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. शक्ती यांना सुरुवातीपासूनच अभ्यासात फारसा रस नव्हता. त्यांना तब्बल तीन शाळांमधून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे आपल्या मुलाने मोठं होऊन आपलाच व्यवसाय सांभाळावा, अशी त्यांच्या वडीलांची इच्छा होती. मात्र, शक्ती यांनी वडीलांच्या विरोधात जाऊन ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरु केला होता. ते वडीलांची गाडी घेऊन बाहेर जायचे. यामुळे दोघांमध्ये खटके देखील उडायचे.
‘त्या’ धडकेने बदललं आयुष्य!
शक्ती कपूर यांनी एका मुलाखतीदरम्यान किस्सा सांगितला होता की, एकदा त्यांची कार ज्येष्ठ अभिनेते फिरोज खान यांच्या कारला धडकली होती. फिरोज खान यांनी त्यांचे आयुष्य कमालीचे बदलले. ते म्हणाले की, एकदा मुंबईत त्यांची कार एका मर्सिडीजला धडकली. यानंतर गाडीतून बाहेर पडल्यावर त्यांना एक उंच आणि देखणा माणूस मर्सिडीजमधून बाहेर येताना दिसला. तो देखणा माणूस दुसरा कोणी नसून, फिरोन खान होते. संधीचा फायदा घेत शक्ती कपूर (Shakti Kapoor) यांनी फिरोज खान यांना सांगितले की, ते पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून आहे आणि त्यांच्याकडे अभिनयाचा डिप्लोमाही आहे. यानंतर त्यांनी फिरोज यांच्याकडे चित्रपटात एखाद्या भूमिकेसाठी विनंतीही केली.
... आणि भूमिका मिळाली!
शक्ती कपूर (Shakti Kapoor) म्हणाले, माझं बोलणं ऐकल्यानंतर फिरोज खान तिथून निघून गेले. काही काळानंतर शक्ती कपूर एका मित्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले. शक्ती यांच्या या मित्राचे नाव के.के. शुक्ला होते. त्यावेळी शुक्ला फिरोज यांच्यासोबत 'कुर्बानी' चित्रपटासाठी काम करत होते. तेव्हा गप्पांच्या ओघात त्यांच्या मित्राने सांगितले की, फिरोज खान त्यांच्या आगामी चित्रपटातील भूमिकेसाठी एका व्यक्तीचा शोध घेत आहेत, ज्याने त्यांच्या कारला धडक दिली होती. शिवाय तो व्यक्ती पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून होता. हे ऐकून शक्ती कपूर खूप खुश झाले आणि म्हणाले मीच आहे तो व्यक्ती! यानंतर त्यांनी फिरोज खान यांच्याशी बोलणी केली आणि ‘कुर्बानी’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका मिळवली. इथून सुरु झालेला त्यांचा हा प्रवास आजही अविरत सुरु आहे.
हेही वाचा :