Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते. वडिलांच्या निधनानंतर दहीहंडी कार्यक्रमांमध्ये गौतमीच्या डान्सचा कल्ला पाहायला मिळत आहे. आता सांगली (Sangli) जिल्ह्यातील पलूसमध्ये गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. पण कार्यक्रमादरम्यान गौतमीचा स्टेजवरच तोल गेल्याचं समोर आलं आहे.
सांगली जिल्ह्यातील पलूसमध्ये पृथ्वी-संग्राम युश फाऊंडेशनतर्फे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडी उत्सवाला नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या नृत्याने रंगत भरली. नाचताना गौतमीचा पाय घसरुन स्टेजवरच तोल गेला. मात्र लगेचच तिने स्वत:ला सावरलं आणि पुन्हा डान्स सुरू केला आहे. या मानाच्या दहीहांडीसाठी 1,55,555 रुपये बक्षीस होतं. तसेच सलामी देणाऱ्या प्रत्येक संघास 25 हजाराचे बक्षीस पृथ्वी-संग्राम युश फाऊंडेशनकडून देण्यात आले होते.
सांगली, कोल्हापूर, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातून जवळपास सात संघ या दहीहांडी उत्सवास उपस्थित राहिले होते. पलूसमधील पैलवान रोहित पाटील यांनी या भव्य अशा दहीहांडी उत्सवाचे आयोजन केले होते. या दहीहांडी उत्सवाला हजारो तरुणांनी गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. दहीहंडी उत्सवाचे प्रमुख आकर्षण राहिलेल्या गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने या दहीहंडी उत्सवात रंगत भरली.
गौतमी पाटीलच्या नृत्यामुळे या दहीहंडी उत्सवाला हजारोंची गर्दी झाली होती. तसेच या गर्दीला आवरण्यासाठी सुरक्षारक्षकांनाही मोठी कसरत करावी लागली. गौतमी पाटीलचा नृत्यादरम्यान तोल गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
गौतमी पाटील मंचावर येताच तरुण मंडळी वेडे होतात. मुंबईतील मागाठाणे येथील दहीहांडी कार्यक्रमामध्ये गौतमी पाटीलने हजेरी लावली होती. प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडी कार्यक्रमात गौतमीने धमाल डान्स केला. त्यावेळी गौतमी म्हणाली,"माझे कार्यक्रम पुण्यात जास्त होतात. पण आज मुंबईकरांचं प्रेम पाहून खूप छान वाटत आहे. मुंबईत नृत्य सादर करताना सुरक्षित वाटलं. आयोजक व्यवस्थित नियोजन करत असल्याने माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला मी सुरक्षित असते".
गौतमीचं 'माझा कारभार सोपा नसतोय रं' (Maza Karbhar Sopa Nastoy) हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं. गौतमीचं हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरलं. सोशल मीडियावरदेखील हे गाणं चांगलच व्हायरल झालं. आता गौतमीच्या आगामी 'घुंगरू' या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या