Gautami Patil Father Passed Away : नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) वडिलांचे निधन झाले आहे. गौतमीचे वडील तीन-चार दिवसांपूर्वी धुळ्यात बेवारस अवस्थेत सापडले होते. त्यानंतर गौतमीला यासंदर्भात माहिती मिळताच तिने त्यांना पुण्यातील चिंतामणी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली (Gautami Patil Father Death).
गौतमी पाटीलच्या वडिलांचे नाव रवींद्र बाबुराव पाटील असे आहे. त्यांच्या दोन्ही किडन्या आणि लिव्हर निकामी झाले होते. पुण्यातील (Pune) चिंतामणी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धनकवडी येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गौतमीचे वडील धुळ्यात सापडलेले बेवारस अवस्थेत
गौतमी पाटीलचे वडील रवींद्र बाबुराव पाटील हे धुळ्यातील (Dhule) आजळकर नगर भागात मरणासन्नावस्थेत सापडले होते. स्वराज्य फाउंडेशनच्या दुर्गेश चव्हाण यांना एक व्यक्ती मरणासन्नावस्थेत असल्याची माहिती मिळताच त्यांनी त्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर बेवारस अवस्थेत सापडलेली व्यक्ती हे लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटीलचे वडील असल्याचं समोर आलं.
वडिलांना होतं लेक गौतमीचं कौतुक
गौतमी पाटीलचे आई-वडील एकमेकांपासून वेगळे झाले असून नृत्यांगणा तिच्या आईकडे राहते. गौतमी पाटील लोकप्रिय झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी तिचे वडील माध्यमांवर झळकले होते. त्यावेळी लेकीबद्दल एबीपी माझाशी बोलताना ते म्हणालेले,"मला माझ्या लेकीची आठवण येत आहे. तिच्या नृत्याचं सर्वत्र कौतुक होत आहे याच वडील म्हणून आनंद आहे. पण तिच्यावर टीका होते तेव्हा वाईट वाटतं".
वडील बेवारस अवस्थेत असल्याचं गौतमीला कळताच तिने याची दखल घेत त्यांना पुण्यातील चिंतामणी रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी ती म्हणाली होती,"माझ्या वडीलांनी आमच्यासाठी कधी काही केलं नसलं तरी माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी नक्कीच करेल आणि वडीलांची जेवढी काळजी घेता येईल तेवढी नक्कीच घेईन". पुण्याआधी गौतमीच्या वडिलांवर धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. वडिलांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर गौतमी त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात ठेवणार होती. आता त्यांचे निधन झाल्याने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत.
संबंधित बातम्या