Alia Bhatt Film : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित आलिया भट्ट (Alia Bhatt) स्टारर ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनेकवेळा लांबणीवर टाकल्यानंतर अखेर हा चित्रपट पुढील महिन्यात म्हणजेच 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. संजय लीला भन्साळी यांनी नुकतीच याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.



‘या’ दिवशी होणार प्रदर्शित


संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट आणि चित्रपटातील इतर स्टारकास्टला कोरोनाची लागण झाली होती आणि त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होण्यासही वेळ लागला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाची रिलीज डेट 18 फेब्रुवारी 2022 निश्चित करण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता त्याची रिलीज डेट पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्याचे नियोजन करण्यात आले होते. अखेर 25 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


 







आलिया पहिल्यांदाच दिसणार हटके भूमिकेत


या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट ‘गंगूबाई काठियावाडी’ची भूमिका साकारत आहे. आलिया चित्रपटांमध्ये दमदार व्यक्तिरेखा साकारत आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही खूप आधी रिलीज झाला आहे. ट्रेलरलाही चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली होती.


आलियाकडे चित्रपटांची रांग


आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ‘गंगूबाई काठियावाडी’ व्यतिरिक्त ती 'RRR' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट जानेवारीतच प्रदर्शित होणार होता, पण त्याचे प्रदर्शनही पुढे ढकलण्यात आले. याशिवाय ती रणबीर कपूरसोबत 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे. रणबीर आणि आलियाला पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. तसेच, काही महिन्यांपूर्वी जाहीर झालेल्या रणवीर सिंगच्या ‘रॉकी और रानीकी प्रेमकहानी’ या चित्रपटाचा आलिया देखील एक भाग असणार आहे.


इतर बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha