One Four Three : अलीकडे सर्व काही रुळावर येऊ लागले असताना, पुन्हा एकदा कोरोनाने त्याचे स्वरूप बदलले आहे आणि त्यात ओमायक्रॉनमुळे (Omicron) पुन्हा नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईवर परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत. रोमँटिक चित्रपटांच्या यादीत ‘वन फोर थ्री’ चित्रपटाने आपले नाव नोंदवले असले तरी हा चित्रपट काहीसा लांबणीवर गेला आहे.


या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख नुकतीच समोर आली आहे. प्रेमाची अनोखी परिभाषा प्रेक्षकांसमोर घेऊन येण्यास 'शारदा फिल्म्स प्रॉडक्शन' निर्मित आणि  विरकुमार शहा निर्मित 'वन फोर थ्री' हा खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट 4 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दाक्षिणात्य चित्रपटांची धाटणी असलेला हा मराठीतील पहिला वहिला चित्रपट असून, बॉलिवूडने देखील या चित्रपटाची दखल घेतली होती. मात्र, हा चित्रपट 11 फेब्रुवारी ऐवजी 4 मार्चला प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षकांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.



चित्रपटाची नवी तारीख जाहीर करत दिग्दर्शक म्हणाले की, 'जगभरात कोरोनाची तिसरी लाट आणि ओमायक्रॉनची भीती यामुळे नववर्षात पुन्हा एकदा संकट येऊन उभे राहिले आहे. वन फोर थ्री चित्रपट हा प्रेमाचे फंडे देणारा असल्याने हा चित्रपट प्रेमाच्या महिन्यात म्हणजेच व्हॅलेंटाईन डे चे औचित्य साधत प्रदर्शित करण्याचे आयोजले होते. मात्र, कोरोना आणि ओमायक्रॉनच्या नव्या संकटामुळे 11 फेब्रुवारीऐवजी हा चित्रपट 4 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अचानक उद्धवलेल्या या संकटामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्यास काही दिवस वाट पाहावी लागणार आहे'.


या चित्रपटात अभिनेता योगेश भोसले आणि शीतल अहिरराव यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. तर अभिनेता वृषभ शहा या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत दमदार असे पदार्पण करणार आहे. ‘हे आपलं काळीज हाय’ या 'वन फोर थ्री' चित्रपटाच्या टॅगलाईनने आधीच धुमाकूळ घातला असताना हा चित्रपट काय नवे घेऊन येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपट प्रदर्शन लांबणीवर गेल्याने प्रेक्षकांमध्ये थोडीशी नाराजी दिसून येत आहे. मात्र, जास्त विलंब न करता हा चित्रपट प्रेमाचे विविध रंग घेऊन 4 मार्चला मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज आहे.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha