मुंबई : 'गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट ज्या कादंबरीवर बेतलेला आहे, त्या कादंबरीच्या लेखकाविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी तक्रारीवर दंडाधिकारी कोर्टानं जारी केलेल्या समन्सला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे लेखक हुसैन झैदी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याआधीच हायकोर्टानं या पुस्तकावर आधारित 'गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाचे निर्माते संजय लीला भन्साळी आणि अभिनेत्री आलिया भटविरोधात बजावलेल्या समन्सलाही स्थगिती दिली आहे.
आलिया भटचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट हुसैन जैदी यांच्या 'द माफिया क्वीन ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित आहे. त्या पुस्तकातील काही भाग बदनामीकारक असून त्यामुळे गगुबांईंची प्रतिष्ठा डागाळली गेली आहे, तसेच गंगुबाईंच्या गोपनीयतेच्या अधिकारांचही उल्लंघन झालं आहे असा दवा करत गंगुबाई काठियावाडी यांचा दत्तक मुलगा बाबूजी रावजी शहा यांनी मुंबईतील महानगर दंडाधिकारी कोर्टात या पुस्तकाचे लेखक हुसैन जैदी यांच्याविरोधात मानहानीचा फौजदारी दावा केला आहे. त्याची दखल घेत महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्यांना समन्स जारी केलं होतं. त्याला हुसैन जैदी यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर बुधवारी सुनावणी पार पडली.
हे पुस्तक एप्रिल 2011 मध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे, तर दंडाधिकाऱ्याकडे तक्रार फेब्रुवारी 2021 मध्ये दाखल करण्यात आल्याचं लेखकांच्या बाजूनं अॅड. गुंजन मंगला यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. तसेच मुंबई शहर दिवाणी न्यायालयाने 'द माफिया क्वीन ऑफ मुंबई'च्या लेखकांना कादंबरीच्या प्रकाशन, विक्री किंवा पुस्तकावर हक्क निर्माण करण्यापासून कायमस्वरुपी रोखण्यात यावं, अशी मागणी करणारा खटला नुकताच फेटाळून लावल्याची बाबही अँड. गुंजन मंगला यांनी न्यायालयाला सांगितली. त्याची दखल घेत न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावत लेखकांना बजावण्यात आलेल्या समन्सला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती देत सुनावणी 6 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली.
संबंधित बातम्या :