Swapnil Joshi On Kalavantancha Ganesh : अभिनेता स्वप्नील जोशीकडे (Swapnil Joshi) दीड दिवसांचा बाप्पा असतो. यंदाचं हे 73 वं वर्ष आहे. बाप्पा आणि स्वप्निलचं नातं खूप युनिक आहे. बाप्पा कधी त्याचा मित्र असतो, कधी मोठा भाऊ असतो, कधी आई असतो तर कधी वडील असतो.
बाप्पाबद्दल एबीपी माझाशी बोलताना स्वप्नील जोशी म्हणाला,"बाप्पा परमेश्वर आहेच. पण त्याच्यासोबत कधी भांडता येतं, रडता येतं, हसता येतं. मन मोकळं करता येतं. बाप्पावर रुसता येतं. बाप्पासोबत नानाविध नाती आहेत. बाप्पा माझ्या पाठीशी असं मला दररोज वाटतं. आयुष्यात दररोज छोटे-मोठे अनेक प्रसंग येतात तेव्हा बाप्पाची आठवण येतेच येते".
आठवणीतल्या गणेशोत्साबद्दल बोलताना स्वप्नील जोशी म्हणाला,"माझ्या आठवणीतला गणेशोत्सव म्हणजे गिरगावातला गणेशोत्सव. गिरगावातील चाळीत माझा जन्म झाला. त्यामुळे गिरगावातील सार्वजनिक गणेशोत्सव हा माझ्या आठवणीतला आहे. रस्ता झाडणे, मांडव घालणे, चार-पाच चाळी मिळून गणेशोत्सव साजरा करणे. विविध कार्यक्रम, स्पर्धा, नाटकं, गणपतीचा प्रसाद, आरती, या सगळ्या आठवणी आहेत. त्यामुळे माझ्या आठवणीतला गणेशोत्सव हा गिरगावातल्या चाळीतला सार्वजनिक गणेशोत्सव आहे".
गणेशोत्सवात डाएट करायचं नसतं : स्वप्नील जोशी
अभिनेता स्वप्नील जोशी गणेशोत्सवात डाएट करत नाही. तसेच चाहत्यांनाही त्याने डाएट न करण्याचा सल्ला दिला आहे. तो म्हणाला,"गणेशोत्सवात डाएट करायचं नसतं. गणेशोत्सवात फक्त आनंद लुटायचा असतो. त्यामुळे या दिवसांत मी डाएट वगैरे काही करत नाही. गणेशोत्सवात मनसोक्त मोदक खाण्यावर माझा भर असतो. मोदक खायला मला प्रचंड आवडतात".
स्वप्नील जोशी पुढे म्हणाला,"गणेशोत्सवाचं यंदाचं 73 वं वर्ष आहे. आमच्याकडे बाप्पाची पंचधातूची मूर्ती असते. त्याला चांदीचं पॉलिश असतं. बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्यांना गोड पदार्थ आणू नका तर प्रसाद म्हणून वेगळ्या गोष्टी आणा असं मी सांगतो. एकवर्षी वह्या घेऊन यायला सांगितलं होतं. त्यानंतर दोन दिवसांत जेवढ्या वह्या जमल्या त्या दान केल्या. एकवर्षी पेन्सिलचं पॅक घेऊन यायला सांगितलं होतं. त्या साठलेल्या पेन्सिल नंतर दान केल्या होत्या. यावर्षी प्रसाद म्हणून पावकिलो साखर आणायला सांगितली आहे. आता दोन दिवसात जेवढी साखर जमेल ते कोणत्यातरी अनाथाश्रमाला किंवा संस्थेला दाण करू असा मानस आहे".
स्वप्नील जोशीने बाप्पाकडे काय मागणं मागितलं?
स्वप्नील जोशी म्हणाला,"प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची मला ताकद दे, बुद्धी दे. दरवर्षी लोकांना जेवढा मी आनंद देतो त्यापेक्षा जास्त आनंद यंदा देऊ शकेन असं माझ्या हातून कार्य घडू देत. चांगले सिनेमे माझ्या वाट्याला येऊदे. चांगले काम करण्याची संधी मला मिळूदे. लोकांचं मनोरंजन करण्याची लोकांच्या आयुष्यात आनंद पसरवण्याची संधी मला मिळू देत. तसेच माझ्या कुटुंबियांवर आणि संपूर्ण महाराष्ट्रावर जी विघ्न येणार असतील ती बाप्पाच्या कृपेने दूर होऊदेत. सगळ्यांची भरभरात होऊदेत. सुख शांती, समृद्धी, समाधान आरोग्य मिळूदेत आणि बाप्पाच्या कृपेने सर्वांचं भलं होऊदेत हे मागणं बाप्पाकडे मागितलं आहे".
संबंधित बातम्या