Fighter Movie: हृतिकचा 'फायटर' रिलीज होण्याच्या दोन महिन्यांपूर्वी मृत्यू; चित्रपटात दहशतवादी झालेला 'तो' अभिनेता कोण?
गुरुवारी (26 जानेवारी) रिलीज झालेल्या फायटर (Fighter) या चित्रपटात मुश्ताक काक यांनी दहशतवाद्याची भूमिका साकारली. पण हा चित्रपट रिलीज होण्याच्या दोन महिने आधीच मुश्ताक यांनी अखेरचा श्वास घेतला.
Fighter Movie: हिंदी चित्रपटसृष्टीत चांगल्या भूमिका मिळवण्यासाठी अनेक कलाकार दिवस-रात्र मेहनत करत असतात. बॉलिवूडमध्ये विविध छटा असणाऱ्या भूमिका साकारण्याची संधी अनेक कलाकारांना मिळाली. मुश्ताक काक हे त्यापैकीच एक आहेत. मुश्ताक काक यांनी अनेक चित्रपटांमध्ये दहशतवाद्याची भूमिका साकारली. गुरुवारी (26 जानेवारी) रिलीज झालेल्या फायटर (Fighter) या चित्रपटात देखील मुश्ताक काक यांनी दहशतवाद्याची भूमिका साकारली. पण हा चित्रपट रिलीज होण्याच्या दोन महिने आधी मुश्ताक यांनी अखेरचा श्वास घेतला. जाणून घेऊयात मुश्ताक काक यांच्याबद्दल...
मुश्ताक काक यांनी अनेक वर्ष रंगभूमीवर काम केले
मुश्ताक काक हे काश्मिरमधील अभिनेते होते. श्रीनगर येथील रहिवासी असलेल्या मुश्ताक यांचा जन्म 1961 मध्ये झाला. त्यांनी अनेक वर्ष रंगभूमीवर काम केले. 100 हून अधिक थिएटर नाटकांचे दिग्दर्शन करणाऱ्या मुश्ताक काक यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये पाकिस्तानी व्यक्ती आणि दहशतवादी या भूमिका साकारल्या.
'फाइटर'मध्ये साकारली दहशतवाद्याची भूमिका
दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या 'फाइटर' या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर, करण सिंह ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात मुश्ताक काक यांनी एका दहशतवाद्याची भूमिका साकारली आहे, जो चित्रपटातील खलनायक अझहर अख्तरची ओळख पाकिस्तानी जनरल आणि ISI नेत्याशी करून देतो. ही छोटी भूमिका पण महत्वाची आहे. मुश्ताक यांच्या कारकिर्दीतील फायटर हा शेवटचा चित्रपट ठरला. मुश्ताक काक यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले.
'गदर 2','तेजस'मध्ये केलं काम
'फायटर'पूर्वी मुश्ताक काक कंगना रनौतच्या 'तेजस' या चित्रपटात देखील काम केलं. याशिवाय त्याने सनी देओलच्या २०२३ मध्ये आलेल्या 'गदर 2' या हिट चित्रपटात तारा सिंहची सून मुस्कानचे वडील कुर्बान खानची भूमिका साकारली होती. पाकिस्तानी लष्कराचा खास व्यक्ती असल्यामुळे कुर्बान खानला तुरुंगात जावे लागते. मुश्ताक काक यांनी अक्षय कुमारचा चित्रपट 'केसरी', जॉन अब्राहमचा रोमियो, अकबर वॉल्टर आणि मनोज बाजपेयी यांच्या 'द फॅमिली मॅन' या मालिकेतही छोट्या पण महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
2007 ते 2024 पर्यंत त्यांनी बॉलिवूडमधील बिग बजेट चित्रपटांमध्ये काम केलं. कमल हासन यांच्या 'विश्वरूपम' आणि 'विश्वरूपम 2' या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. तसेच 'हायजॅक', 'ढिशूम' आणि 'एमएस धोनी: एन अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं.
100 हून अधिक नाटकांचे केले दिग्दर्शन
मुश्ताक काक यांनी नाट्यक्षेत्रात देखील काम केलं. ते श्री राम सेंटरशी आर्टिस्टिक डायरेक्टर म्हणून जोडले गेले होते. अंधा युग, मलिका आणि प्रतिबिंग या त्यांच्या नाटकांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. एवढेच नाही तर 2015 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 100 हून अधिक नाटके दिग्दर्शित केली.
कॅन्सरशी झुंज अपयशी
मुश्ताक काक यांनी 19 नोव्हेंबर 2023 रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांनी 62 वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या एक वर्षांपासून ते कर्करोगाशी लढा देत होते. त्यांची मुलगी इफ्रा काक हिने त्यांच्या निधनाची माहिती दिली. मुश्ताक काक यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली.
View this post on Instagram