कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या अडचणीत वाढ; बंगळुरुनंतर आता दिल्लीमधील शो रद्द
बंगळुरुनंतर (Bengaluru) आता मुनव्वरचा दिल्लीमधील (Delhi) शो देखील रद्द करण्यात आला आहे.
Munawar Faruqui : प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) हा त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. मुनव्वर हा वेगवेगळ्या मुद्द्यांवर मतं मांडत असतो. त्याच्या स्टँडअप कॉमेडिचा शो आता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बंगळुरुनंतर आता मुनव्वरचा दिल्लीमधील शो देखील रद्द करण्यात आला आहे.
शनिवारी (28 ऑगस्ट) होणारा मुनव्वरचा शो रद्द करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या परवाना शाखेने मुनव्वरच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यास नकार दिला आहे. विश्व हिंदू परिषदेने दिलेल्या धमकीनंतर त्यांचा शो रद्द करण्यात आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेंट्रल डिस्ट्रिक्ट पोलिसांनी एका अहवालात लिहिलं की, मुनव्वरच्या शोमुळे जातीय शांतता बिघडू शकते. मुनव्वर फारुकीचा हा कार्यक्रम 28 ऑगस्ट रोजी दिल्लीतील केदारनाथ साहनी सभागृहात होणार होता. स्थानिक पोलिसांनी या शोसाठी परवाना देण्यासाठी परवाना शाखेकडे विनंती पाठवली, परंतु परवाना शाखेने कार्यक्रमाला परवानगी देण्यास नकार दिला.
25 ऑगस्ट रोजी VHP दिल्लीचे अध्यक्ष सुरेंद्र कुमार गुप्ता यांनी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून मुनव्वरनं आपल्या शोमध्ये हिंदू देवतांची खिल्ली उडवली असा आरोप केला. एका वृत्तानं दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी 26 ऑगस्ट रोजी सकाळी मध्यवर्ती जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेट घेतली आणि कमला मार्केट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या सर्व निषेधाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी हिंसाचार भडकण्याची भीती व्यक्त केली होती.
टी राजा सिंह यांनी दिली होती धमकी
मुनव्वरच्या कार्यक्रमाला रद्द करण्याचे आवाहन भाजपचे नेते टी राजा सिंह यांनी तेलंगना सरकारकडे आणि पोलिसांकडे केले होते. त्यांच्या मते, मुनव्वरच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये. टी राजा सिंह यांनी सांगितलं आहे की, 'जर मुनव्वरचा कार्यक्रम झाला तर आम्ही तिथे जाऊन त्याला मारु. कार्यक्रमाचे तिकीट आमचे कार्यकर्ते विकत घेतली आणि पुढे काय होईल ते तुम्हाला माहित आहे.'
बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौतच्या 'लॉक अप' या कार्यक्रमामुळे मुनव्वर घराघरांत पोहोचला. त्याच्या 'ख्वाब' या गाण्याला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली. सोशल मीडियावर हे गाणं व्हायरल झालं होतं. लॉक-अप या शोमुळे मुनव्वरला विशेष लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाचा तो विजेता ठरला होता. 70 दिवस मुनव्वर हा लॉक अप कार्यक्रमामध्ये होता.हा कार्यक्रम जिंकल्यानंतर मुनव्वरला ट्रॉफी व्यतिरिक्त, मुनव्वरला 20 लाख रुपयांचे रोख पारितोषिक, एर्टिगा गाडी आणि इटलीच्या सहलीवर जाण्याची संधी देखील मिळाली आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: