CM Shinde on Kangana Ranaut : कंगनावर झालेल्या 'त्या' कारवाईचा मुख्यमंत्री शिंदेंकडून उल्लेख, नेमकं काय म्हणाले?
CM Shinde on Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौत हिच्यावर महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या कारवाईचा उल्लेख केला आहे.
CM Shinde on Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हीने उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वात असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारविरोधात अनेक आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. त्यातच तिने त्याच काळात बीएमसीवरही ताशेरे ओढेले होते. मुंबईची तुलना तेव्हा 'पाकव्याप्त काश्मीर'सोबत केली होती. त्यानंतर बीएमसीनेही कंगनाच्या घरावर कारवाई केली. या सगळ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे.
अभिनेत्री कंगना रणौत हिला भाजपकडून लोकसभा निवडणुकांचं तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे कंगना आता हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरली आहे. पण कंगनावर विरोधी पक्षांकडूनही वारंवर टीकेची झोड उठवली जातेय. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंगनावर झालेल्या कारवाईचा उल्लेख केल्याने पुन्हा एकदा कंगना चर्चेचा विषय ठरलीये.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलं?
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यंत्रणांचा दुरउपयोग केला जातो,असा टोला विरोधकांकडून वारंवार लगावला जातोय. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं की, सत्तेचा दुरउपयोग, यंत्रणांचा दुरउपयोग हा त्यावेळेस करत होते. हनुमान चालिसा वाचणाऱ्या जोडप्याला तुरुंगात टाकलं, अभिनेत्री कंगना रणौत हिचं घर तोडलं, अशी अनेक प्रकरणं आहे. सत्तेचा दुरउपयोग, यंत्रणा वापरायची आणि लोकांना नाहक त्रास द्यायचा हे काम कोणी केलं? असा सवाल यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, सत्ता वापरुन महाविकास आघाडी अधिक मजबूत करणं हे काम त्यांनी केलं.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईची 'पाकव्याप्त काश्मीर' अशी तुलना केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या अभिनेत्री कंगना रनौतचा शिवसेनेशी पंगा सुरु झाला. त्यानंतर अचानक कंगनाला वांद्रे येथील तिच्या कार्यालयात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिका कायद्यातील कलम 354(अ) नुसार नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर उत्तर देण्यासाठी कंगनाला 24 तासांची मुदत देण्यात आली होती. पण, तिच्याकडून कोणतेही उत्तर न आल्याने पालिकेकडून तिथे 9 सप्टेंबरला तोडकामाला सुरुवात करण्यात आली.