Avadhoot Gupte : अवधूत गुप्तेच्या घरात माकडाचा धुमाकूळ; व्हिडीओ शेअर करत म्हणाला,"मला माकड चेष्टा खुप्ते..."
Avadhoot Gupte : अवधूत गुप्तेच्या घरात माकडाने धुमाकूळ घातला आहे.
Avadhoot Gupte : लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) सध्या 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. पण आता एका वेगळ्याच गोष्टींमुळे तो चर्चेत आला आहे. अवधूतच्या घरात चक्क माकडाने धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्याने खास पोस्ट लिहिली आहे.
अवधूतने घरात माकड फिरत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच त्याने 'तुम्हाला काय खुपते.. तर सध्या आम्हाला दररोज सकाळी उठून बघायला मिळणारी एक माकड चेष्टा खुपते?' अशी मिस्कील पोस्ट लिहली आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये माकड घरात इकडून तिकडे फिरत आहे. तसेच माकडाने घरातील केळी घेत तिथेच खायला सुरूवात केली असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
अवधूत गुप्तेची पोस्ट काय आहे? (Avadhoot Gupte Shared Post)
अवधूतने लिहिलं आहे,"हो गुप्ते .. तुम्हाला काय खुपते? तर सध्या आम्हाला दररोज सकाळी उठून बघायला मिळणारी एक 'माकड चेष्टा' खुपते. व्हिडिओमध्ये दिसणारी ही माझी आई. तिचं आम्ही दोन वर्षांपूर्वी लंग ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन केलं आहे. तर, तिच्या नाकावर टिच्चून घरात येऊन केळी पळवणारा (पळवणारा कुठला.. तिथेच बसून खाणारा!) आणि तिच्याच अंगावर धावून जाणारा हा हुप्प्या बघा".
अवधूतने पुढे लिहिलं आहे,"‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान‘ हे बाजूलाच असल्यामुळे विविध पक्षी- प्राण्यांच्या भेटी हे खरंतर आमच्या श्रीकृष्णनगरचे आभूषण. आम्ही हे वर्षानुवर्षांपासून मिरवत देखील आलो आहोत. ही माकडं पिढ्यानपिढ्यापासून आता ‘शंभर टक्केच्या वन्य जीवनाला‘ मुकली आहेत. झाडावर राहतात, तरी टाकीवरच्या पत्र्याखाली झोपतात. आमच्याच झाडावरच्या तुत्या, जाम, आंबे, पेरू वगैरे फळे काढून खातात सुद्धा. पण, ते केवळ हौसे खातर! बाकी.. सकाळी घरांच्या खिडक्यातून चपात्या लाटण्याचे आवाज आणि फोडण्यांचा वास सुटला, की खिडकीच्या जाळ्यांवर येऊन ओरडा आरडा करून हक्काने हे सर्व पदार्थ मागतात".
View this post on Instagram
अवधूतने चाहत्यांना सांगितलं आहे,"यापुढे तुम्ही कुठेही फिरायला गेलात आणि माकड दिसल्यावर त्यांना काही बाही खाऊ द्यायला तुमचा हात किंवा मुलं पुढे सरसावलीच.. तर हा व्हिडिओ नक्की आठवा! एवढेच काय ते". अवधूतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संबंधित बातम्या