ना जया, ना रेखा, या अभिनेत्रीसोबत अमिताभ बच्चनची जोडी ठरली सुपरहिट; 11 चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर केली जादू
Amitabh Bachchan Hit Films: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. कोण आहे ती, ओळखता का?
Amitabh Bachchan Hit Films: 70च्या दशकात अवघी हिंदी चित्रपटसृष्टी (Hindi Film Industry) गाजवणारा अभिनेता कोण? असा प्रश्न कुणाला विचारलाच, तर प्रत्येकाच्याच तोंडी नाव येईल, शहंशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan). 'जंजीर' (Zanjeer) चित्रपटानं बिग बींना (Big Bi) यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवलं. अमिताभ बच्चन यांनी अनेक सुप्रसिद्ध अभिनेत्रींसोबत स्क्रिन शेअर केली. काही चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं, तर काहींना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण अशातच जर अमिताभ आणि अभिनेत्रींच्या गाजलेल्या जोड्यांबाबत बोलायचं झालं तर, सर्वांच्या तोंडी जया (Jaya Bacchan) किंवा रेखा (Rekha) ही दोनच नावं चटकन येतात. पण तुम्हाला माहिती आहे का? ज्या अभिनेत्रीसोबत अमिताभ यांची जोडी सिल्वर स्क्रिनवर सुपरहिट ठरली, त्या अभिनेत्रीचं नाव ना रेखा, ना त्यांची रिअल लाईफ पत्नी जया. या दोघींव्यतिरिक्त ही तिसरीच सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. जिनं अमिताभ यांच्यासोबत एकापेक्षा एक सुपरडुपरहिट चित्रपट दिले.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. गेल्या 50 वर्षांत त्यांनी अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत रुपेरी पडदा गाजवला, मात्र अमिताभ बच्चन यांची एका अभिनेत्रीसोबतची ऑनस्क्रीन केमिस्ट्री सर्वाधिक यशस्वी ठरली. आम्ही तुम्हाला ज्या अभिनेत्रीबद्दल सांगत आहोत, तिचं नाव राखी.
हो ना जया, ना रेखा... तर सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे राखी. अमिताभ बच्चन यांनी करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपटांमध्ये काम केलं, पण त्यांना फारशी ओळख मिळाली नाही. 1973 मध्ये त्यांना 'जंजीर' चित्रपट मिळाला, ज्यानं ते रातोरात सुपरस्टार बनले. यानंतर बिग भी यांनी आजवर मागे वळून पाहिलं नाही. वयाच्या 82 व्या वर्षीही ते टीव्हीपासून मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांना भूरळ घालत आहेत.
अमिताभ बच्चन यांनी रेखा, जया बच्चन आणि परवीन बाबी यांच्यासह अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. पण मोठ्या पडद्यावरची राखीसोबतची त्याची जोडी सर्वांनाच खूप आवडली होती. या दोन्ही स्टार्सनी मिळून जवळपास डझनभर हिट चित्रपट दिले आहेत. पण, त्याचतुलनेत जया बच्चन आणि रेखा यांच्यासोबत अमिताभ बच्चन यांचे फारच कमी चित्रपट हिट झालेत.
राखी आणि अमिताभ बच्चन यांची जोडी रुपेरी पडद्यावर सर्वात यशस्वी ठरली आहे. दोघांनी 13 चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं, त्यापैकी 'रेश्मा और शेरा' आणि 'शान' बॉक्स ऑफिसवर आपली जादू फारशी दाखवू शकले नाहीत. पण, दुसरीकडे पाहिलं तर, या दोघांनी एकत्र 11 हिट चित्रपट देण्याचा विक्रम केला. त्यांच्या हिट चित्रपटांमध्ये 'कभी कभी', 'शक्ती', 'मुकद्दर का सिकंदर', 'त्रिशूल', 'बरसात की एक रात' आणि 'एक रिश्ता: द बॉन्ड ऑफ लव्ह' आणि इतर चित्रपटांचा समावेश आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांची पत्नी जया बच्चन यांच्यासोबत 9 चित्रपटांमध्ये काम केलं, तर रेखा यांनी त्यांच्यासोबत 11 चित्रपटांमध्ये काम केलं. परवीन बाबी यांनी त्यांच्या करिअरमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत 12 चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
अमिताभ बच्चन यांचे चित्रपट केवळ अभिनेत्रीच नव्हे तर अनेक प्रमुख कलाकारांसह यशस्वी ठरले आहेत. अमिताभ आणि शशी कपूर यांची जोडी खूप प्रसिद्ध होती आणि त्यांनी 12 चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. अमिताभ बच्चन यांनी मुलगा अभिषेक बच्चनसोबत 5 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर शाहरुख खाननंही अमिताभ यांच्यासोबत 5 चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
अमिताभ बच्चन यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत अमिताभ बच्चन यांचा 'वेट्टियाँ' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा त्यांचा पहिला तमिळ चित्रपट आहे. यापूर्वी बिग बी 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात अश्वत्थामाच्या भूमिकेत दिसले होते. नाग अश्विनच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात प्रभास, दीपिका पदुकोण आणि कमल हसन यांच्या प्रमुख भूमिका होत्या.