Akshay Kumar: '100 टक्के माझी चूक'; बॅक टू बॅक फ्लॉप ठरलेल्या चित्रपटांवर अक्षयची प्रतिक्रिया
बॅक टू बॅक फ्लॉप ठरलेल्या चित्रपटांवर अक्षय कुमारनं (Akshay Kumar) प्रतिक्रिया दिली आहे.
Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असणारा अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. अक्षयचे काही चित्रपट सुपरहिट ठरले तर काही चित्रपटांना मात्र प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. काही दिवसांपूर्वी अक्षयचा 'सेल्फी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कमाई करत नाही. 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षयच्या 'सुर्यवंशी' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर रिलीज झालेला त्याचा रामसेतू हा चित्रपट फ्लॉप ठरला. अक्षयचे 'लक्ष्मी', 'बच्चन पांडे' यांसारख्ये चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप ठरले. आता चित्रपटांना मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिसादावर अक्षयने प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला अक्षय?
एका मुलाखतीमध्ये अक्षयने सांगितलं, "हे माझ्यासोबत पहिल्यांदा घडतंय असं नाही. माझ्या करिअरमधील जवळपास 16 चित्रपट फ्लॉप ठरले. असा काळ देखील होता, जेव्हा माझे आठ चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप ठरले. या सगळ्यामध्ये माझीच चूक आहे. प्रेक्षक किंवा इतर कोणालाही दोष देऊ नका. 100 टक्के ही माझी चूक आहे. तुमचा चित्रपट फ्लॉप ठरतो तर तो प्रेक्षकांमुळे नाही. तुम्ही चुकीचा चित्रपट निवडल्याने तो फ्लॉप ठरतो."
पुढे अक्षयने सांगितलं, "प्रेक्षकांची आवड बदलली आहे, त्यामुळे मी देखील बदललं पाहिजे."
2022 हे वर्ष अक्षयसाठी अत्यंत कठीण होते. कारण 2022 मध्ये रिलीज झालेले 'बेल बॉटम' आणि 'सम्राट पृथ्वीराज' हे चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप ठरले. त्याचा काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'सेल्फी' या चित्रपटाने 'ओपनिंग डे'ला 3 कोटींची कमाई केली. आता हा चित्रपट हिट ठरलेल की फ्लॉप या प्रश्नाचं उत्तर लवकरच अक्षयच्या चाहत्यांना मिळाले.
अक्षयचे आगामी चित्रपट
अक्षयचा 'हेरा फेरीः 3' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे. रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी अक्षय, सुनील आणि परेश रावल यांची 'हेरा फेरी 3' या चित्रपटासाठी मुंबईतील एम्पायर स्टुडिओमध्ये बैठक झाली. त्यानंतर आता या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. चित्रपटाचा पहिला भाग 2000 मध्ये आला होता, तर दुसरा भाग 2006 मध्ये आला होता. आता 17 वर्षांनंतर या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: