Actress Laila Khan Case : संपत्ती अन् काळं कृत्य लपवण्यासाठी सावत्र पित्यानंच काटा काढला; अभिनेत्री लैला खान हत्याप्रकरणी परवेझ टाकला फाशी
Actress Laila Khan Case : फेब्रुवारी 2011 मध्ये परवेझ टाकने लैला खान आणि तिच्या कुटुंबातील इतर पाच सदस्यांची इगतपुरी येथील फार्म हाऊसवर निर्घृण हत्या केली आणि मृतदेह तिथेच जमिनीखाली पुरले होते.
Actress Laila Khan Case : अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी परवेझ टाक याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. अभिनेत्री लैला खानच्या (Actress Laila Khan Case) हत्येच्या प्रकरणाच्या 13 वर्षानंतर न्यायालयाने आपला निकाल सुनावला आहे. दोषी परवेझ टाक हा मृत लैला खानचा सावत्र पिता आहे. फेब्रुवारी 2011 मध्ये परवेझ टाकने लैला खान आणि तिच्या कुटुंबातील इतर पाच सदस्यांची इगतपुरी येथील फार्म हाऊसवर निर्घृण हत्या केली आणि मृतदेह तिथेच जमिनीखाली पुरले होते. मुंबई सत्र न्यायालयाने हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असल्याचे म्हणत परवेझला फाशीची शिक्षा दिली.
हे संपूर्ण प्रकरण 13 वर्षे जुने आहे. दोषी परवेझने लैला, तिची आई आणि चार भावंडांची हत्या केली होती. हत्येनंतर त्यांचा मृतदेह फार्म हाऊसमध्ये पुरला होता. पोलिसांच्या चौकशीत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. लैलाचे वडील नादिर पटेल यांनी मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. टाक आणि त्याचा साथीदार आसिफ शेख यांनी लैला आणि तिच्या कुटुंबीयांचे अपहरण केल्याचे तक्रारीत म्हटले होते.
आधी पत्नीला संपवले, नंतर मुलाची हत्या केली...
फेब्रुवारी 2011 मध्ये ही घटना घडली. नाशिकमधील इगतपुरी येथील बंगल्यात परवेझ टाकचा सेलिनासोबत वाद झाला. त्यानंतर या वादातून तिने त्याची हत्या केली. परवेझने सेलिनानंतर लैला आणि तिच्या चार भावंडाची हत्या केली असल्याचे पोलीस तपासात समोर आली.
पोलिसांनी सांगितले की, सेलिना आणि कुटुंबीयांनी त्याला एका नोकरासारखी वागणूक दिली. सेलिना आणि तिचे कुटुंब दुबईला स्थलांतरीत होईल आणि आपल्याला एकटे भारतात सोडतील. सेलिना आपला दुसरा नवरा आसिफ शेखला इगतपुरी येथील फार्म हाऊसचा ताबा देणार असल्याचा त्याचा समज झाला होता. सेलिनाने परवेझ सांगितले होते की, शेखकडे सगळ्या संपत्तीची देखभाल करण्याची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पॉवर ऑफ अॅटॉर्नीदेखील तयार केली आहे.
दोषी परवेझला सेलिना आणि शेख यांची वाढती जवळीकही परवेझला पसंत नव्हती. त्यामुळेच त्याने सेलिनाचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. सेलिनाची हत्या करताना परवेझला लैला आणि इतर सदस्यांनी पाहिले होते. त्यामुळे परवेझने त्यांनाही संपवले.
असं उघडकीस आले प्रकरण
एकाच कुटुंबातील सहाजणांची हत्या झाल्याची घटना काही महिन्यांनंतर उघडकीस आली. परवेझ टाकला जम्मू-काश्मीर पोलिसांनी फसवणुकीच्या प्रकरणात अटक केल्यानंतर सगळे प्रकरण उघडकीस आले. सुरुवातीला परवेझ टाक हा आपले सगळे कुटुंबिय हे दुबईत असल्याचे सांगत होता. जम्मू-काश्मीर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने लैला आणि इतरांची हत्या केली असल्याचे सांगितले. त्याच्या या कबुली जबाबानंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. टाक याने जम्मू-काश्मीरमध्ये वन कंत्राटदार म्हणून काम केले.
फार्म हाऊसमध्ये सापडला हाडांचा सापळा
पोलिसांच्या चौकशीत परवेझने आपण हत्या केली असल्याची बाब मान्य केली. लैला आपल्या कुटुंबियांसह सुट्टीसाठी इगतपुरीच्या फार्म हाऊसवर गेली होती. त्यावेळी त्याने सगळ्यांची हत्या केली आणि त्याच ठिकाणी खड्डा खणून सगळ्यांचे मृतदेह पुरले होते.
कोण आहे लैला खान? (Who is Laila Khan)
लैला खानचं खरं नाव रेश्मा पटेल (Reshma Patel) असं आहे. लैला खानने 'वफा : अ डेडली लव्ह स्टोरी'च्या माध्यमातून 2008 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती राजेश खन्नासोबत झळकली. या चित्रपटांतील बोल्ड सीन्समुळे लैला चर्चेत आली. लैला खान आणि राजेश खन्ना यांच्यातील बोल्ड सीन्स या चित्रपटासाठी चित्रीत करण्यात आले होते. 30 जानेवारी 2011 मध्ये लैलाची हत्या झाली. मुनीर खानसोबत अभिनेत्रीचं लग्न झालं होतं. नादिर शाह पटेल हे लैलाच्या वडिलांचं नाव असून सेलिना पटेल असं तिच्या आईचं नाव आहे.