Aamir Khan Quits Social Media: आमीर खानचा सोशल मीडियाला रामराम, प्रॉडक्शन हाऊसच्या अकाऊंटवरून संपर्कात राहणार
आमीरने अचानक सोमवारी दुपारी 4 च्या सुमारास एक पत्रक सोशल मीडियावर पोस्ट केलं. या पोस्टमध्ये आपण सोशल मीडियाला रामराम ठोकत असल्याचं त्याने सांगितलं आहे.
कयामत से कयामत तक, लगान, हम है राही प्यार के, दंगल असे एकापेक्षा एक चित्रपट देऊन मिस्टर परफेक्शनिस्ट अशी प्रतिमा तयार करणाऱ्या आमीर खानने सोशल मीडियालाच रामराम ठोकायचा निर्णय घेतला आहे. विशेष बाब अशी की रविवारी म्हणजे 14 मार्चलाच आमीरने आपला 56 वा वाढदिन साजरा केला होता. काल त्याला फिल्म इंडस्ट्रीतल्या अनेकांनी त्याच्या सोशल मीडियावर भरघोस शुभेच्छा दिल्या. यामध्ये दलेर मेहंदी, अजय देवगण, रितेश देशमुख, सचिन तेंडुलकर, सोनाली कुलकर्णी, यो यो हनी सिंग आदी अनेकांचा समावेश होतो. त्यांच्या शुभेच्छांना आमीरने उत्तरही दिलं आहे.
आलेल्या प्रत्येक शुभेच्छा संदेशाला रिट्विट करत या शुभेच्छांचा स्विकार केला आहे. असं असताना आमीरने अचानक सोमवारी दुपारी 4 च्या सुमारास एक पत्रक सोशल मीडियावर पोस्ट केलं. या पोस्टमध्ये आपण सोशल मीडियाला रामराम ठोकत असल्याचं त्याने सांगितलं आहे. आपण सोशल मीडिया सोडत असलो तरी आमीर खान प्रॉडक्शनच्या ऑफिशिअल अकाऊंटवरून आपल्या चित्रपटांची माहीती मी देत राहणार आहे असं तो म्हणतो. या पोस्टमध्ये त्याने आपल्या सर्व फॉलोअर्सचा, मित्रांचा, हितचिंतकांचे आभार मानले आहेत.
सोशल मीडिया आपण सोडत असलो तरी आपण कार्यरत असणार आहोतच. आपल्या प्रॉडक्शन हाऊसमार्फत आपल्या प्रोजेक्ट्सची माहिती आपण इथे देत राहूच असं त्याने सांगितलं आहे. त्याचं हे प्रॉडक्शन हाऊस लवकरच व्हेरिफाईडही होणार असल्याची माहिती त्याने दिली. एकेपीपीएल ऑफिशिअल असं त्याच्या प्रॉडक्शन हाऊसचं नाव असणार आहे.
आमीर खानचे लाखो चाहते जगभर पसरले आहेत. म्हणून आमीरचे ट्विटरवर फॉलोअर्स आहे तब्बल 26.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर ही संख्या आहे 3.6 मिलियन्स. इन्स्टाग्रामवर त्याने 147 पोस्ट्स केल्या आहेत. तर ट्विटरवर आमीर केवळ 9 लोकांना फॉलो करतो. यात सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, फातिमा साना शेख, सलमान खान, ह्रतिक रोशन, करण जोहर, सान्या मल्होत्रा यांचा समावेश होतो.
आमीर खानचा सध्या लालसिंह चढ्ढा हा चित्रपट तयार आहे. तो कोव्हिडच्या लाटेमुळे थांबला आहे. आता पुन्हा एकदा सर्व चित्रपटगृहे खुली झाल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.