(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Third Eye Asian Film Festival: 19 व्या थर्ड आय आशियाई महोत्सवाची 12 डिसेंबर पासून सुरुवात; आशा पारेख यांचा होणार सन्मान
सुधीर नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली 2002 साली सुरु झालेल्या या महोत्सवाचे हे 19 वे वर्ष आहे.12 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2022 दरम्यान हा चित्रपट महोत्सव पार पडणार आहे.
Third Eye Asian Film Festival: आशियाई फिल्म फौंडेशनतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या थर्ड आय आशियाई महोत्सवाची सुरुवात दिनांक 12 डिसेंबर पासून मुंबई मध्ये होत आहे. सुधीर नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली 2002 साली सुरु झालेल्या या महोत्सवाचे हे 19 वे वर्ष आहे. मुंबई मधील चित्रपट रसिकांसाठी आशिया खंडातील समकालीन चित्रपट पाहण्याची संधी या महोत्सवाच्या माध्यमातून चित्रपट रसिकांना मिळत असते. अशा प्रकारचा हा एकमेव चित्रपट महोत्सव आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहयोगाने संपन्न होत असलेल्या या महोत्सवाला प्रभात चित्र मंडळाचे विशेष सहकार्य लाभले आहे.
12 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2022 दरम्यान पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या या महोत्सवात इराण, बांगलादेश, श्रीलंका अशा विविध आशियायी देशांमधील आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले तीस चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.
या महोत्सवाचे उद्घाटन 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटर मध्ये होणार आहे. यावेळी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या श्रीमती आशा पारेख यांचा सन्मान करण्यात येणार आहे.या महोत्सवाचा शुभारंभ सरथ कोथालावाल आणि कुमारा थिरीमदुरा दिग्दर्शित ‘द न्यूजपेपर’ या श्रीलंकन सिनेमाने होणार आहे.सांगता समारंभात अनिक दत्ता दिग्दर्शित अपराजितो हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.
कंट्री फोकस विभागात सहा श्रीलंकन चित्रपट प्रदर्शित केले जाणार असून प्रथमच गुजराती चित्रपटांचा विशेष विभाग या महोत्सवात असणार आहे.राष्ट्रीय पुरस्कार विजेता हेल्लारो हा अभिषेक शहा दिग्दर्शित चित्रपट या विभागाचे खास आकर्षण असणार आहे. धाड, 21 एम यु टिफिन , रेवा , आ छे मारू गाव हे गुजराती चित्रपट या विभागात समवेश केला गेलाय. बंगाल ,मणिपूर ,आसाम ,गोवा इथे निर्माण झालेले डिक्शनरी ,स्तेलोन माय पोनी , गॉड ऑन द बाल्कनी, केजरो या प्रादेशिक चित्रपटांचा समावेश महोत्सवात असून फनरल, गोदाकाठ , काळी माती, भारत माझा देश आहे, फास हे मराठी चित्रपट देखील प्रदर्शित केले जाणार आहेत. दिवंगत दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना श्रद्धांजली म्हणून डॉ. संतोष पाठारे दिग्दर्शित सुमित्रा भावे एक समांतर प्रवास हा माहितीपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात येणार आहे.
महोत्सवा दरम्यान लघुपटांची स्पर्धा आयोजित केली आहे. एकशे वीस लघुपटांच्या प्रवेशिकांमधून निवडक तीस लघुपटांचे प्रदर्शन महोत्सवात होणार असून मान्यवर परीक्षक त्यातील दोन लघुपटांना पारितोषिके जाहीर करणार आहेत.महोत्सवाची प्रतिनिधी नोंदणी रवींद्र नाट्य मंदिर येथे दिनांक 5 डिसेंबरपासून सुरु झाली असून प्रतिनिधी शुल्क रु. 500 आणि फिल्म सोसायटी सदस्य व विद्यार्थ्यांसाठी रु 300 असेल. महोत्सवाची online नोंदणी सुरु झाली आहे.