Bigg Boss OTT Armaan Malik Viral Clip : बिग बाॅसमध्ये अश्लील चित्रीकरण, मर्यादा ओलांडल्या जातायत, बंद करा; अरमान मलिकच्या व्हायरल क्लिपनंतर शिवसेना संतप्त
Bigg Boss OTT Armaan Malik Viral Clip : काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात अरमान मलिकची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली. या व्हायरल क्लिपवरून शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला असून या शोचे चित्रिकरण बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Bigg Boss OTT Armaan Malik Viral Clip : बिग बॉस ओटीटी सध्या चांगलंच चर्चेत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमध्ये राड्यामुळे हा शो चर्चेत आला होता. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात अरमान मलिकची (Armaan Malik) एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली. या व्हायरल क्लिपवरून शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Group) आक्रमक झाला असून या शोचे चित्रिकरण बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आमदार डॉ. मनिषा कायंदे (Armaan Malik) यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. त्यावेळी ही मागणी केली.
छोट्या पडद्यावर बिग बॉस या रिएल्टी शोला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर खास ओटीटीवरील प्रेक्षकांसाठी बिग बॉस ओटीटीचा सीझन सुरू करण्यात आला. यंदाच्याही सीझनमध्ये सेलिब्रिटींसोबत सोशल मीडिया इन्फ्लूएंजर स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच अरमान मलिक आणि त्याची दुसरी पत्नी कृतिका यांच्यातील कथित आक्षेपार्ह कृतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चांना उधाण आले होते. नेटकऱ्यांनी बिग बॉसच्या घरातील असे कृत्य दाखवल्याने नाराजी व्यक्त केली होती.
शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या, विधान परिषद आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी आज मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेत निवेदन सादर केले. डॉ. कायंदे यांनी म्हटले की, बिग बॉसमध्ये अश्लील चित्रीकरण दाखवले जात आहे. त्यांनी आता या शोमध्ये मर्यादा ओलांडल्या आहेत. जे सुरू आहे ते योग्य आहे का असा सवाल विचारत त्यांनी उपस्थित करत लहान मुले देखील हा शो पाहत असल्याकडे लक्ष वेधले.
अरमानच्या बोलण्याचा लोकांवर परिणाम
डॉ. कायंदे यांनी यावेळी युट्युबर अरमान मलिकविरोधात संताप व्यक्त केला. अरमान मलिक जे बोलत आहेत, त्याचा परिणाम लोकांच्या मनावर होतो. तो स्वत:ला हिंदू म्हणवतो पण त्याच्या कृतीने कौटुंबिक नात्याच्या सीमा आणि सामाजिक मूल्ये पायदळी तुडवले जात असल्याचे कायंदे यांनी म्हटले. ओटीटी प्लॅटफॉर्मवरही सेन्सॉरचा वचक राहावा असे त्यांनी म्हटले. याबाबत आम्ही केंद्रीय नेत्यांना भेटून यावर वचक रहावा ही विनंती करणार आहोत, याची माहिती त्यांनी दिली. आज पोलिस आयुक्त यांची भेट घेऊन त्याचे चित्रीकरण थांबवण्याची विनंती केली. याप्रकरणीतथ्य पडताळून कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले असल्याचे डॉ. मनिषा कायंदे यांनी म्हटले.