Bappi Lahiri Passed Away : जवळपास पाच-सहा दशके चित्रपटसृष्टीमध्ये हटके संगीत शैलीने बप्पी लाहिरी यांनी आपली छाप सोडली होती. प्रेक्षकांची मने जिंकलेल्या बप्पी लाहिरी यांनी राजकारणातही नवी इनिंग खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांची ही राजकीय कारकिर्द अतिशय अल्पजीवी ठरली. काही वर्षातच त्यांनी सक्रिय राजकारणातून माघार घेतली. बप्पी लाहिरी यांनी 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. 


बप्पी लाहिरी यांनी 2014 मध्ये तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला होता. बप्पी लाहिरी यांनी पश्चिम बंगालमधील श्रीरामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. युपीए-2 विरोधात असलेली नाराजी, मोदी लाट आणि त्याच्या जोडीला बप्पी लाहिरी यांची लोकप्रियता यामुळे निवडणुकीच्या रिंगणात ते विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, बप्पी लाहिरी यानी निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांनी त्यांचा पराभव केला. बप्पी लाहिरी हे तिसऱ्या स्थानावर होते. कल्याण बॅनर्जी यांना 5 लाख 14 हजार 933 मते मिळाली. तर बप्पी लाहिरी यांना 2 लाख 87 हजार 712 मते मिळाली. दुसऱ्या स्थानावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तीर्थकार रॉय होते. त्यांना 3 लाख 62 हजार 407 मते मिळाली. 


या निवडणुकीनंतर बप्पी लाहिरी यांनी राजकीय क्षेत्रात फार सक्रियता दाखवली नाही. पश्चिम बंगाल भाजपच्या समितीमधून 2017 मध्ये बप्पी लाहिरी यांना वगळण्यात आले होते. आपण राजकारणात राजनाथ सिंह आणि नरेंद्र मोदी यांच्यामुळे उतरलो होतो. या दोघांबद्दल मनात आदर असल्याचे बप्पी यांनी त्यावेळी सांगितले होते. राजकारणाला वेळ देता नसल्याने आपली प्राथमिकता सध्या चित्रपट असल्याचे बप्पी यांनी सांगितले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha